सावंत हे गृहमंत्री नात्याने असफल

'आप'ची टीका; डॉक्टरांनासुद्धा सुरक्षित ठेऊ शकले नाहीत म्हणत लगावला टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पर्वरी येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा आम आदमी पक्षाने (आप) निषेध केला आहे. या प्रकरणात कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, आपच्या वैद्यकीय कक्षाचे नेते डॉ. मारियानो गुदिन्हो यांनी न्याय मागण्यासाठी डॉक्टरांना आंदोलन करण्यास भाग पाडल्याबद्दल भाजपा सरकारला फटकारलं. डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याऐवजी त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यात भाजप सरकार अधिक व्यस्त आहेत. हा हल्ला दोन दिवसांपूर्वी होऊनसुद्धा आरोग्य मंत्री राणे यांनी ठोस पावलं उचलली नाहीत. त्याऐवजी ते गोमेकॉच्या डीन पदाच्या निवडीमध्ये हस्तक्षेप करण्यात व्यस्त होते. जीपीएससीची निवड पात्र नसल्याचा पवित्रा घेत पुरेशी पात्रता नसणारे डॉ. बांदेकर हेच डीन पदासाठी सक्षम असल्याची भूमिका राणे यांनी घेतली आहे, असं डॉ. मारियानो म्हणालेत.

हेही वाचाः कोलवा समुद्रात 6 मच्छीमारांना जीवदान

डॉक्टरांच्या संरक्षणाचं सरकारला काहीच पडलेलं नाही

डॉक्टरांनी कोरोना कालावधीत केलेल्या कामाचे कौतुक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरताना भाजप कधीच मागे नसतं. परंतु त्यांच्याशी संबंधित असलेल्या समस्या किंवा त्यांच्या संरक्षणाचे त्यांना काहीच पडलेलं नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेहमीच अभिमानाने स्वतःच्या नावापुढे ‘डॉक्टर’ असं लावतात, परंतु आता त्यांनी इतर डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी साधा हस्तक्षेपसुद्धा केला नाही. आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा होता, त्याऐवजी ते गोमेकॉच्या डीनसाठी त्यांच्या निवडीला अनुकूल करण्यासाठी, एका स्वायत्त संस्थेला अधिक महत्त्व देण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. हे लक्षात घ्यावं लागेल, की आरोग्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पुरवठादाराची एकतर्फी निवड केल्यामुळे दुसऱ्या लाटेदरम्यान मानवनिर्मित ऑक्सिजन संकट निर्माण झालं होतं, असं डॉ. मारियानो म्हणाले.

वरिष्ठ डॉक्टरांना रस्त्यावर उतरावं लागलं हे लज्जास्पद

पोलिसांच्या उदासीनतेच्या निषेधार्थ अनेक वरिष्ठ डॉक्टरांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि हे गोव्यासाठी लज्जास्पद आहे. गृहमंत्रालयाचे कर्तव्य होतं की, त्यांनी या प्रकरणात तात्काळ आणि कडक कारवाई करावी, आणि असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असं ठणकावून सांगावं. त्याऐवजी, भाजपा सरकार मुख्य आरोपींना संरक्षण देण्यात व्यस्त होतं, डॉक्टरांना त्यांचे महत्त्वाचं काम सोडून त्यांचा अमूल्य वेळ खर्च करून निषेध आणि कारवाईची मागणी करण्यास भाग पाडत होतं. हे भाजप सरकारचं आणि विशेषत: गृहमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांचे सर्वात मोठं अपयश आहे, असे डॉ. मारियानो म्हणाले.

हेही वाचाः ACCIDENT | शेळपे येथे अपघात; शिवोलीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांच्या निष्क्रियतेचे कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही

“गोवा मेडिकेअर सर्व्हिस पर्सोनल कायदा, 2013” सारखे विशिष्ट कायदे अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यासाठी आणि अशा घटनांविरोधात प्रतिबंध निर्माण करण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगून, डॉ. गुदिन्हो म्हणाले, की या प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेचे कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. राणे यांच्यावर निशाणा साधत डॉ. गुदिन्हो म्हणाले, एका व्यक्तीची बाजू घेण्यासाठी गोमेकॉसारख्या स्वायत्त संस्थेच्या हिताच्या बाबतीत पुढे – मागे करण्यात राणे व्यस्त आहेत.

हेही वाचाः खुशखबर! फ्लिपकार्ट देणार ४ हजार जणांना रोजगार

कोरोनाच्या काळात जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांना आदर नाही का?

ज्यावेळी डॉक्टरांवर हल्ला केला जातो, त्या वेळी मुख्यमंत्री गप्प बसतात आणि आरोग्य मंत्री जीपीएससीच्या विरोधात काम करण्यात व्यस्त असतात. कोरोनाच्या काळात जीव तोडून काम करणाऱ्या या आघाडीच्या योद्ध्यांचा आदर नाही का? असा प्रश्न आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी उपस्थित केला. डॉक्टरांच्या बंधुत्वाला पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना आम आदमी पार्टीने सांगितलं की, डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पक्ष पुढील कारवाई करेल.

हा व्हिडिओ पहाः Crime | Viral Police Rada | निलंबित पोलिसाची लांबलचक फेसबूक पोस्ट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!