जीव वाचवा! अर्थव्यवस्था वाचवा! गोवा वाचवा!

हॉस्पिटलीटी क्षेत्राच्या लसीकरणाला हवं प्राधान्य; तज्ज्ञांची सरकारकडे मागणी; पर्यटक, नागरिकांच्या सुरक्षेसह अर्थचक्र गतिमान राहणं आवश्यक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: लॉकडाऊनची वेळ आणू नाका. आपले मुख्यमंत्री खरंच बोललेत. कुणी कितीही चेष्टा करो वा टीका करो पण खरंच आजच्या घटकेला मागच्या सारखं लॉकडाऊन झालं आणि सगळं काही थांबलं तर रोगापेक्षा इलाज कठोर असंच चित्र पाहायला मिळणार आहे. आता यातून सुटका करून कशी घ्यायची हा खरा प्रश्न आहे. एखादं अस्मानी संकट किंवा महामारी येते तेव्हा केवळ एकट्याने किंवा प्रशासनाने विचार करून चालत नाही. या संकटाला आणि महामारीला परतवून लावायचं असेल तर एकत्रित आणि सामुहीत पद्धत अवलंबवावी लागेल. आजच्या घडीला तेचं करावं लागेल. आपणं सर्वांनीच जबाबदारीनं वागायचं ठरवलं तर हे निश्चितपणे शक्य आहे. यासाठी मतभेद, वाद, टीका किंवा एकमेकांना लक्ष्य करण्याचं सोडून सर्वांचं भलं कसं होईल, यावरच आपल्याला आपली शक्ती पणाला लावायची आहे. राज्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय हे आकडे पाहता राज्यात करोनाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट होतंय. यामुळे जसं सरकारने प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक आणि कोविड योद्ध्यांना लस दिली, तसंच लसीकरणात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कामगारांना प्राधान्य देणं गरजेचं आहे, अशी मागणी या उद्योगातील तज्ज्ञांनी केलीये.

हॉस्पिटलीटी क्षेत्राच्या लसीकरणाला हवं

पंचतारांकित हॉटेल्स, टॅक्सी व्यावसायिक, बस चालक-वाहक, शॅक्स व्यावसायिक यांचा थेट नागरिकांशी संबंध येतो. या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचा पर्यटकांशीही संपर्क येतो. सध्या राज्यात टाळेबंदी, सीमाबंदी अथवा संचारबंदी नाही. यामुळे हळूहळू पर्यटक राज्यात येतायत. पर्यटकांना रोखल्यास हॉटेल्स, शॅक्स, टॅक्सी व्यवसाय ठप्प होईल. यातून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. ही अर्थव्यवस्था कोलमडू नये, यासाठीच राज्य सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतलेला नाही. हे रास्त असलं तरी बाहेरून येणार, विशेषतः पर्यटकांमार्फत करोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणूनच हॉटेल्स, शॅक्स, बसेस चालवणारे वाहक-चालक, टॅक्सीवाले यांना प्राधान्याने लस देणं गरजेचं आहे. सरकारने त्वरित हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कर्मचाऱ्यांना लस देण्याचा आदेश जारी करण्याची गरज आहेत.

हॉस्पिटॅलिटी कर्मचाऱ्यांना लस देण्याशिवाय पर्याय नाही : गौरीश धोंड

  • हॉटेलमध्ये पर्यटक येत असतात. शिवाय काही कामानिमित्ताने बाहेरील लोकही हॉटेलमध्ये येत असतात. हॉटेल व्यवस्थापन व अन्य कर्मचारी यांच्याशी त्यांचा थेट संबंध येतो. म्हणून या कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्याची गरज आहे. वास्तवात अर्थचक्राला गती देणाऱ्या या क्षेत्रातील कामगारांना यापूर्वीच लस देण्याची आवश्यकता होती.
  • सरकारने आता ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू आहे. हॉटेल उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यास हरकत नाही. याशिवाय कदंबचे चालक आणि वाहक, टॅक्सीवाले, पेट्रोल पंपावरील कर्मचारी अशांनाही प्राधान्याने लस द्यायला हवी. कारण यांचा थेट संबंध सामान्य नागरिकांशी येत असतो.
  • कदंबच्या वाहकांचा आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा दिवसाकाठी हजारो नागरिकांशी थेट संबंध येतो. यामुळे कोविड काळात तेही फ्रंटलाईनवरच सेवा बजावत आहेत. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत त्यांना कोविड लस देणं गरजेचं आहे. जेणेकरून संभाव्य संकट टळेल.
गौरीश धोंड

पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी सुरक्षित असणं हिताचं : नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

  • कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी, परिस्थिती गेल्या वर्षापेक्षा चांगली आहे. आता प्रतिबंधात्मक लस आली आहे. शिवाय कोणती काळजी घ्यावी आणि कसे उपचार घ्यावेत, याची माहिती झाली आहे. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झाल्यास त्यांच्यात प्रतिकारक्षमता तयार होईल. लसीचा दुष्परिणाम होत नाही, हेही सिद्ध झालंय.
  • सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चाचण्याचा वेग वाढवण्याबरोबरच लसीकरणाचा वेगही वाढवावा लागेल. हॉटेल कर्मचारी, टॅक्सीवाले, कदंब तसंच खासगी बसेसचे वाहक यांचा सामान्य लोकांशी व पर्यटकांशी थेट संबंध येत असतो. यामुळे या क्षेत्रातील सर्वांनाच प्राधान्याने लस देणं गरजेचं आहे.
  • अर्थचक्र सुरळीत चालण्यासाठी हॉटेल्सपासून पर्यटन क्षेत्रातील सर्वच उद्योग सुरू राहणं आवश्यक आहे. म्हणून या उद्योगातील कर्मचारी सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना प्राधान्याने लस दिली पाहिजे. म्हणनूच टीटीएजीने सरकारला तशा मागणीचं निवेदन एक महिन्यापूर्वीच पाठवलं आहे. अजून त्यावर काहीच निर्णय झालेले नाही.
नीलेश शहा

पर्यटकांची सुरक्षाही महत्त्वाची : क्रुज कार्दोज, अध्यक्ष, शॅक्स मालक कल्याण सोसायटी

  • हॉटेल्स तसंच शॅक्समधील कर्मचाऱ्यांचा थेट पर्यटक व लोकांशी संपर्क येत असतो. सध्या पर्यटकांची संख्या जास्त नाही. पण ते हळूहळू येतायत. त्यांची संख्या वाढतेय. पर्यटकांना सांभाळण्याची गरज आहे. कर्मचारी आणि पर्यटक या दोघांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस देणं गरजेचं आहे.
  • हॉटेल्स, शॅक्स, टॅक्सीवाले, बसेसचे वाहक हेदेखील फ्रंटलाईन कर्मचारीच ठरतात. कारण यांच्यावर अर्थव्यवस्था उभी आहे. म्हणून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याची व्यवस्था सरकारजवळ असायला हवी. करोनाचा उद्रेक झाला असल्यानं याची नितांत गरज आहे. तरच करोनावर नियंत्रण ठेवणं शक्य होईल.
क्रुज कार्दोज

सरकारला सहाय्य करू

कोरोनावर मात करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आपल्या देशाने कोरोना विरोधी लस तयार केलीये. या लसीकरणातून काही प्रमाणात का होईना पण या भीषण विषाणूंपासून सुरक्षा मिळवण्यात मदत होतेय. जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. परंतु अपेक्षेप्रमाणे जनता या लसीकरणात सहभागी होतेय, असं वाटत नाहीये. हा मनातील संशय, भिती, संभ्रम दूर होणं आवश्यक आहे. लसीकरण हे ऐच्छीक आहे. इथे सक्ती केली जाऊ शकत नाही. परंतु या ऐच्छिकपणाला विचाराची आणि परिपक्वतेची जोड असायला हवी. भारतीयांकडून ही अपेक्षा आहे. एवढं करूनही आपण स्वतःहून या लसीकरणाला सहकार्य करत नसू तर आपण स्वतः आपल्याच भारतीयांना धोक्यात घालतोय असं होणार नाही का. तेव्हा प्रत्येकाने मुक्तपणे आणि निसंशयपणे या लसीकरणात सहभागी होणं गरजेचं आहे.

फ्रंटलाईन योध्यांचे आभार

या कोरोनाच्या काळात आपल्याला जगवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्धांना सलाम करावा तेवढा कमी. त्यांनी जर माघार घेतली असती आणि आपला जीव सांभाळण्याची चिंता केली असती तर आपणा सर्वांचाच जीव धोक्यात आला असता. देशात मार्च 2020 पासून लॉकडाऊन जारी झाला. सुरुवातीला या लॉकडाऊनची भिषणता लक्षात आली नाही. थाळ्या वाजवल्या. मेणबत्या लावल्या पण नंतर नंतर कोरोना विषाणूंका फैलाव असा झाला की लोक पटापट मरू लागले. इस्पितळे कमी पडू लागली. लोकांवर उपासमारीची वेळ आली. कित्येक लोकांचे बळी गेले. उर्वरीत कोट्यवधी लोक जिवंत राहीले खरे, परंतु त्यांचं जगण्याचं साधन हरवलं आणि त्यांच्यावर हलाखीचं जगणं ओढवलं. लाखो लोकांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं. या एकंदर परिस्थितीतून माणूस कसा गेलाय याचा विचार केला तरीही अंगावर काटा उभा राहतो. या काळात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेला तोड नाही. ते मग आरोग्य कर्मचारी असतील. रूग्णवाहिका चालक, वाहक, सफाई कामगार, पोलिस, अग्निशमन दल एवढेच नव्हे तर कोरोना रूग्णांना इस्पितळ आणि कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणारे सगळेच आले. या पहिल्या लाटेची भिषणता आम्ही सगळ्यांनीच अनुभवलीय. सुदैवाने आपल्या देशानेच पहिली कोरोना लस शोधून काढली. आज देशभरात जगातील सर्वांत मोठं लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु अजूनही लोकांच्या मनात भीती, संभ्रम आहे आणि तो दूर होण्याची गरज आहे.

पर्यटन राहीलं तरच गोवा शाबूत

कोरोनाचा मोठा फटका गोव्याला बसलाय. आधीच खाण उद्योग बंद झाल्यानं सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. एकीकडे आर्थिक संकट आणि दुसरीकडे कोरोना महामारी यातून राज्याला बाहेर काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आली. राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढतंय. एकीकडे कोरोनापासून लोकांना सरंक्षण द्यायला हवं आणि दुसरीकडे लोकांचं आणि राज्याचं पोट सांभाळायला हवं अर्थात राज्याची अर्थव्यवस्था शाबूत ठेवायला हवी. लॉकडाऊनचा अनुभव खूपच वाईट होता. या परिस्थितीची आठवणं जरी काढली तरीही अंगावर काटा उभा राहतो. या परिस्थितीत पर्यटन हा एकमेव उद्योग गोव्याला तारणारा ठरू शकतो. पर्यटन उद्योगावर अनेक बारीक सारीक लोक अवलंबून आहेत. या उद्योगात नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणंही शक्य आहे. आदरातिथ्य क्षेत्र हाच सध्याच्या परिस्थितीत गोव्याला संकटमोचक ठरू शकतो. कोरोनाच्या काळातही गोव्यात पर्यटक येताहेत हेच या राज्याचं वेगळेपण आहे. आता वाढत्या कोरोनाचा दोष पर्यटकांनाच देऊन कसं चालणार. हे क्षेत्र बंद करायचं ठरवलं तर गोव्याला वाचवणारं दुसरं काहीच शिल्लक राहणार नाही आणि नंतर आपल्याला वाचवणाराही कुणी राहणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.

हॉस्पिटलीटीला हवा फ्रंटलाईनचा दर्जा

केंद्र सरकारच्या धोरणानुसार फ्रंटलाईन कर्मचारी, सफाई कामगार, तसंच 45 वर्षांवरील नागरीकांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आलंय. एवढं करूनही लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये. राज्य सरकारने आदरातिथ्य अर्थात पर्यटनाशी संबंधीत क्षेत्राला फ्रंटलाईनचा दर्जा देण्यासंबंधीचे पत्र केंद्राला लिहिलंय. तशी माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिलीये. राज्यातील अगदी सामान्य खानावळ ते तारांकित हॉटेल्स, इतर हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स, क्लब्स, कॅसिनो, पर्यटकांचे आकर्षण ठरणारे शो रूम्स, दुकानं तसंच पर्यटकांची वाहतूक करणारे टॅक्सीवाले, पायलट आदी सर्वांना सुरक्षा कवच मिळणं गरजेचं आहे. त्यांना सुरक्षा मिळाली तरच त्यांच्याशी संपर्कात येणारे पर्यटक आणि नागरिक सुरक्षित राहणार आहेत. हे सगळे घटक सेवा देणारे आहेत आणि त्यामुळे त्यांचा समावेश फ्रंटलाईनमध्ये करून त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत केवळ पर्यटनावर परिणाम होऊ नये म्हणूनच तर लॉकडाऊन अडलं आहे. असं असेल तर मग याच पर्यटनाला सरक्षा कवच प्राप्त करून देण्यात कमीपणा कसला. या संकल्पनेला गोव्यातून पाठिंबा मिळायला हवा. सर्वांनीच एकजुटीने ही मागणी करायला हवी. सरकारने आपली सगळी ताकद पणाला लावून आणि सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन केंद्राची मनधरणी करण्याची गरज आहे. गोव्याच्या भवितव्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आपण इथे कमी पडत असू तर ही पोकळी नंतर भरून काढणं बरंच कठीण जाणारेय हे मात्र नक्की.

हेही वाचाः वयाचं बंधन नको पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्वांना लस द्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!