आधी जमिनी आमच्या नावावर करा!

इतर ठिकाणी जागा देऊन प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे प्रकल्पाआधी सरकारने आमची झाडे असलेल्या तसेच आम्ही कसत असलेल्या जमिनी आमच्या नावावर करून द्याव्यात, असे शेळ-मेळावलीतील स्थानिक सांगतात.

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

पणजी : नियोजित आयआयटी (IIT) प्रकल्पाचे फायदे सांगणारे सरकार त्याचे नुकसान मात्र सांगत नाही. या प्रकल्पामुळे शेळ-मेळावलीतील स्थानिकांची अवस्था मोपावासीयांप्रमाणेच होणार आहे. त्यामुळे सरकारने आमची झाडे असलेल्या जमिनी आमच्या नावावर कराव्या. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आम्ही समाधानी नाही, अशी भूमिका शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर घेतली.

सरकार प्रकल्प आणू पाहत असलेल्या जागेवर आमची काजू, आंबे तसेच इतर झाडे आहेत. प्रकल्पात ती झाडे नष्ट होऊन आमच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे. इतर ठिकाणी जागा देऊन आमचा प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे प्रकल्पाआधी सरकारने आमची झाडे असलेल्या तसेच आम्ही कसत असलेल्या जमिनी आमच्या नावावर करून द्याव्यात. अनेक वर्षांची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करावी, असे आवाहन स्थानिक शंकर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे चार जणांची समिती नको, आमचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष मेळावलीत येऊन बैठक घेऊनच सोडवावेत. हा लढा आम्ही संघटितपणे लढत आहोत. त्यामुळे आम्हाला अशाप्रकारच्या समितीची गरज नाही, असे ते म्हणाले.

बैठकीला केवळ 40 लोक उपस्थित होते. त्यांतील 13 जणांनी प्रस्तावित जागेत आपल्या जमिनी असल्याचे सांगितले. पण बैठकीला उपस्थित नसलेल्या अनेकांच्या नावावर तेथील जमीन आहेत. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मेळावलीत येऊनच घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आंदोलनाचे प्रमुख शुभम शिवोलकर, शशिकांत सावर्डेकर, राम मेळेकर, पांडुरंग शिवोलकर आदी उपस्थित होते.

स्थानिकांची भूमिका

  • मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर आम्ही समाधानी नाही
  • इतर ठिकाणी नको, आहे त्याच जमिनी आमच्या नावावर करा
  • सरकारने संपूर्ण सत्तरीतील जमिनींचे प्रश्न सोडवावे
  • आमचे आंदोलन सामूहिक, समितीची गरज नाही
  • मुख्यमंत्र्यांनी मेळावलीत येऊन आमचे प्रश्न सोडवावे

स्थानिक आमदार, पंच मंडळावर अविश्वास
गुळेलीचे पंच मंडळ तसेच स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री यांना बैठकीत सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पंच बैठकीला आले नाहीत; पण आमदार उपस्थित होते. आमदार बैठकीत बोलणार नाहीत अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर स्थानिकांनी बैठक आणि सादरीकरणास बसण्याची तयारी दर्शवली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!