अंतर्गत वाद शमवण्यासाठी संतोष लवकरच गोव्यात

काही मंत्री स्थानिक ज्येष्ठ नेत्यांचे निर्देश पाळत नसल्यानेच पाचारण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजप मंत्री, आमदारांतील वाद शमवण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष लवकरच गोव्यात दाखल होणार आहेत. काही मंत्री स्थानिक ज्येष्ठ नेत्यांचे निर्देश पाळत नसल्याने थेट संतोष यांनाच बोलावून घेण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

हेही वाचाः करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी पूर्ण

विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यव्यापी दौरे सुरू केले आहेत. अशातच मंत्री मॉविन गुदिन्हो, मायकल लोबो, आमदार एलिना साल्ढाणा, आरोग्यमंत्री यांच्यासह इतर काही मंत्री, आमदारांतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. मंत्री गुदिन्हो, लोबो यांना स्थानिक नेत्यांनी समजावूनही ते ऐकायला तयार नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर या मंत्री, आमदारांना स्वत: दुखावण्यापेक्षा केंद्रातील ज्येष्ठ नेत्यामार्फत त्यांची समजूत काढण्याचा निर्णय संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष तानावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. त्याचसाठी संतोष यांना पाचारण केले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कारणांचा शोध सुरू

पक्षाने निर्देश देऊनही काही मंत्री आपल्याला हवी तशी वक्तव्ये करत आहेत. त्याचा फटका निवडणुकीत पक्षाला बसू शकतो. हे लक्षात घेऊन हे मंत्री, आमदार कोणत्या कारणामुळे असे वागत आहेत याचा शोध संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याकडून घेतला जात आहे. ठोस कारणे हाती आल्यानंतर पक्ष त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही समजते.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | BJP | स्वपक्षीय मंत्र्यावर टीका करणं भोवलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!