साखळी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना मोठा धक्का

सगलानी गटाचे उमेदवार अवघ्या १८ मतांनी विजयी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

साखळी : साखळी हा खरंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ. मात्र आपल्याच मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणुकीच्या निकालानं हादरा दिलाय. साखळी नगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये सगलानी गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. अवघ्या १८ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. या विजयानं भाजपची साखळी नाचक्की झाली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा पराभव मुख्यमंत्र्यांचा जिव्हारी लागणार असल्याचं जाणकार सांगतात

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखळीतील धक्कादायक निर्णयानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पालिका निवडणुकांमध्ये एकीकडे भाजपनं पणजी पालिका राखली. डिचोली, पेडण्यासह वाळपईतही आपली ताकद आणि वर्चस्व राखण्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि मंत्र्यांना यश आलंय. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघाच झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

आता मुख्यमंत्री काय करणार?

संपूर्ण साखळी मतदार संघावरती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं वर्चस्व असलं तरी साखळी नगरपालिका मात्र त्यांना आपल्या बाजूनं आणण्यात अपयश आलंय. साखळी नगरपालिकेवरती सगलानी यांनी या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करुन आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपणच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं याआधीच वेळोवेळी सांगितलेलं आहे. मात्र साखळी पोटनिवडणुकीतील पराभवामुळे प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदालाही धक्का लागणार की काय, अशीही कुजबूज सुरु झाली आहे. भाजपची अंतर्गत गटबाजी पणजी पालिकेत चव्हाट्यावर आली. आता विधानसभेसाठी भाजपमध्ये अंतर्गत कलह तर होणार नाही ना, अशी शंका साखळी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं घेतली जाते आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!