‘संजीवनी बंद’मुळे ‘या’ भागातील ऊस पीक धोक्यात

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
नगरगाव : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यात गेल्या वर्षापासून ऊस घेणे बंद केल्याने नगरगाव पंचायत भागातील ऊस शेतकरी संकटात आला आहे. एवढेच नव्हे तर, ऊस पिकाचे भवितव्य धोक्यात आले आहे.
संजीवनीचे भवितव्य अंधकारमय असून पुन्हा सुरू होईल ही शक्यता कमीच आहे. त्यामुळे, नगरगाव भागातील ऊस शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे झाले आहे. नगरगाव भागात माळोली, कोदाळ या गावात आजही ऊस लागवड करणारे शेतकरी आहेत. ऊस हे नगदी पीक आहे. काहींनी आधुनिक यंत्रणेचा वापर करून ऊस लागवड केली आहे. त्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. सत्तरीत काही गावात ऊस पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची सोय केली आहे.
डिसेंबरमध्ये ऊस तोडायचा झाला की कामगारांना आधीच चतुर्थीत काही आर्थिक मोबदला द्यावा लागतो. आजच्या घडीला ऊस लागवड करणे कठीण बनले आहे. त्यामुळे नवीन शेतकरी तयार होताना दिसत नाहीत. जे आधीपासून ऊस लागवड करीत आले आहेत, तेच तग धरून आहेत.
बांबर गावचे माळोली येथील जागेत पीक घेणारे सुनील मराठे म्हणाले की, उसाला वेळेत दर मिळत नसल्याने उत्पादन क्षेत्र पाच एकरावरून तीन एकर केले. कोदाळ गावात राम झिप्रो ओझरेकर, संतोष गावकर, हरिश्चंद्र पालकर, उदय ओझरेकर, गुरुदास बांदेकर आदी काही शेतकरी आजही ऊस लागवड करीत आहेत.
पुढील दहा वर्षांसाठीची नुकसानभरपाई द्या!
पूर्वी दोनशे रुपये तोडणीला दर सरकारकडून दिला जायचा. पण आता मुख्यमंत्री सावंत यांनी त्यात चारशे रुपयांची वाढ करून सहाशे केला. पण, ऊस तोडणीचा दर मात्र हातात दिलेला नाही. जर सरकारला कारखाना कायमचा बंद ठेवायचा असेल तर सरकारने पुढील दहा वर्षाची नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यासाठी सर्वे करून एकरी तीस टन उत्पादन या प्रमाणे नुकसानभरपाई पुढील दहा वर्षाची दिली पाहिजे, अशी ऊस उत्पादक शेतकर्यांची मागणी आहे.