दक्षिण गोव्यातील सांगेत १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : राज्यातील लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांना आता स्थानिक पातळीवरुन लॉकडाऊननं प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक मतदारसंघात, पंचायतींत आणि नगरपालिकांमध्ये अधिक कडक निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानंतर आता सांगेमध्येही १० दिवसांच्या संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तस पत्रकही आमदार प्रसाद गांवकर यांनी जारी केलंय.

सांगेमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करत असल्याचं प्रसाद गांवकर यांनी पत्रात म्हटलंय. संपूर्ण लॉकडाऊनच्या घोषणेसोबत अत्यावश्यक दुकानं ही सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहतील, असंही नमूद केलंय. अत्यावश्यक दुकानांमध्ये भाज्या, दूध, किराणा मालाची दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असणार आहे. ७ मे पासून १६ मे पर्यंत सांगेतमध्ये लॉकडाऊन असेल, असं आमदार प्रसाद गांवकर यांनी स्पष्ट केलंय.
राज्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आधीच राज्य सरकारनं कडक निर्बंध जारी केलेत. त्यानंतर या निर्बंधांमध्ये वाढही करण्यात आली होती. अत्यावश्यक नसलेल्या दुकानांवरही निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी हे लॉकडाऊनचा निर्णय घेत असून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. ५ मे, २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसरा, सांगेत सध्याच्या घडीला एकूण ४२६ कोरोना रुग्ण आहेत.
