सांगेतील कोविड रुग्णांमध्ये कामगार अधिक

कोविड रुग्णसंख्या वाढली; २०० कामगारांची चाचणी; ११ ते १४ एप्रिल टीका उत्सव

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सांगे आरोग्य केंद्राच्या कक्षेत दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या महिन्यात शून्यावर असलेला आकडा आता तब्बल २२ वर पोहोचलाय. एकूण बाधितांपैकी अर्धेअधिक कामगार येथे असलेल्या एका कंपनीत काम करणारे आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून अंदाजे दोनशे कामगारांची चाचणी करण्यात आलीये. तसंच कंपनीच्या आवारात व कंपनीच्या आतील भागात सॅनिटायझेशन करण्यात आलंय. हा परिसर मायक्रो कण्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलाय.

७३ वर्षीय महिलेचं निधन

दरम्यान, शुक्रवारी येथे एका ७३ वर्षीय महिलेचं निधन झालं. अत्यवस्थ स्थितीत त्या महिलेला सांगे आरोग्य केंद्रात दाखल केलं होतं. तिला श्वास घेण्यात त्रास होत होता. यावेळी त्या महिलेला कोविडची लागण झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचाः ब्रेकिंग | राज्यात पुन्हा ५००पेक्षा जास्त नव्या रुग्णांचं २४ तासांत निदान

११ ते १४ एप्रिल टीका उत्सव

सांगे आरोग्य केंद्रात ११ एप्रिल ते १४ एप्रिल असे चार दिवस टीका उत्सव साजरा केला जाणारेय. ४५ वर्षांवरील सर्वांनी या लसीकरण उत्सवाचा फायदा घ्यावा, असं आवाहन आरोग्य अधिकारी सीमा पै फोंडेकर यांनी केलंय. लसीकरण केल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो. तसंच मृत्यूचा दरही कमी होत असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्यामुळे या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलंय. सांगे आरोग्य केंद्रात रविवारी, तसंच इतर सुट्टीच्या दिवशी ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती फोंडेकर यांनी दिलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!