साकवाळ पंचायतः अविश्वास ठराव मंजूर होताच सरपंच घरी

रमाकांत बोरकर यांच्याविरुद्ध 9 मतांनी अविश्वास ठराव संमत

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को: साकवाळ पंचायतीत घेण्यात आलेल्या खास बैठकीत सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरुद्ध 9 मतांनी अविश्वास ठराव संमत झाला. या बैठकीला सरपंच रमाकांत बोरकर व त्यांची पत्नी पंच सुनीता बोरकर अनुपस्थित राहिले.

5 ऑक्टोबर रोजी दाखल केला अविश्वास ठराव

गेल्या 5 ऑक्टोबर रोजी साकवाळ पंचायतीच्या 11 पंच सदस्यांपैकी 9 जणांनी सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस मुरगाव गटविकास कार्यालयात दाखल केली होती. यावर चर्चेसाठी मंगळवारी साकवाळ पंचायतीत ख़ास बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, बैठकीला सरपंच रमाकांत बोरकर आणि त्यांची पत्नी पंच सुनीता बोस्कर अनुपस्थित राहिल्या. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेतले असता रमाकांत बोरकर यांच्याविरुद्ध 9 मतांनी अविश्वास ठराव संमत झाल्याने त्यांची सरपंच पदाची खुर्ची निसटल्याचं निश्चित झालं.

नवीन सरपंच निवडण्यासाठी लवकरच तारीख निश्चित होणार

साकवाळ पंचायतीचा नवीन सरपंच निवडण्यासाठी लवकरच तारीख निश्चित होणार आहे. पुढील सरपंच कोण हे अजून स्पष्ट झालं नसलं, तरी साकवाळचे माजी सरपंच गिरीश पिल्ले यांना पुन्हा एकदा सरपंच बनण्याचा मान मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत नवीन सरपंच निवडण्यात येणार नाही तोपर्यंत उपसरपंच सुकोरिना वालीस यांच्याकडे ताबा असणार आहे.

इतर पंच सदस्यांची कामे करत नसल्यानेच अविश्वास ठराव दाखल

अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपसरपंच सुकोरिना वालीस यांनी सांगितलं की, मावळते सरपंच बोरकर इतर पंच सदस्यांची कामे करत नसल्यानेच त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावेळी इतर काही पंच सदस्यांनी याला दुजोरा दिला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!