सात दिवसांत अवैध दारूविक्री बंद करा; अन्यथा…

सालेली ग्रामस्थ आक्रमक. गावात एकही मान्यताप्राप्त दारूचं दुकान नसताना काही लोक अवैधरीत्या करतात दारूची विक्री. गावातील शांतता, सलोखा धोक्यात आल्याचा दावा.

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरी : सालेली इथं केल्या जाणार्‍या अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दारूविक्री करणार्‍यांवर सात दिवसांत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे अबकारी आयुक्त, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, वाळपई पोलिस ठाण्याचे निरीक्षक तसेच होंडा सरपंचांकडे केली आहे.

गावात एकही मान्यताप्राप्त दारूचं दुकान नसताना काही लोक अवैधरीत्या दारूची विक्री करतात. या प्रकारांमुळे गावाची बदनामी होते. शिवाय अन्य भागांतील लोक दारू पिण्यासाठी इथं येतात. त्यामुळं गावाची बदनामी होते, असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. होंडा-सालेली रस्ता व झर्मे-सालेली रस्ता हे दारूविक्रीचे अड्डे बनले आहेत. या ठिकाणी 5-6 इसम दारूविक्री करतात. सहजपणे मिळणार्‍या दारूमुळे अन्य भागांतील तळीराम गावात येतात. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असं ग्रामस्थांनी म्हटलंय.

दारूविक्रीमुळे होते गावाची बदनामी
गावात एकही मान्यताप्राप्त दारूचं दुकान नाही. गावात बारच नसल्यामुळं दारूविक्रीला वाव नाही. परंतु अवैध रीतीने गावात दारू आणली जाते. या भागात दारू विकली जाते, अशी माहिती मिळताच साहजिकच परिसरातील तळीराम गावात येतात. त्यामुळं गावातील शांतता, सलोखा तर बिघडतोच. शिवाय गावाची बदनामीही होते. म्हणूनच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली आहे.

दारूमुळं होतात कुटुंबं उद्ध्वस्त
दारूच्या व्यसनामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूच्या व्यसनापायी अनेकांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी केली. अनेकजण आयुष्यातून उठले. दारूच्या अतिरेकामुळं व्याधींनी शरीरं पाखरली गेली. आणि अनेकांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. दारूचे असे अनेक धोके असताना आणि ग्रामस्थांचा विरोध असतानाही दारूची अवैधपणे विक्री गावात केली जाते, याबद्दल सालेली ग्रामस्थ संताप व्यक्त करतात. विशेषत: गावातील महिलांनी या संदर्भात आवाज उठवला आहे. त्यांच्या मागणीवर प्रशासन कारवाई करतं की नाही, याकडे ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत. सात दिवसांच्या आत कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थ कोणता पवित्रा घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.