अशी केली पगारापेक्षा दुप्पट कमाई

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी
पणजी : करोनाकाळातील लॉकडाऊनमुळे राज्यातील कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. नोकऱ्या गेल्याने विदेश तसेच विविध राज्यांतून गोव्यात परतलेल्या युवकांतील अनेकजण गेल्या तीन महिन्यांपासून शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या पडीक जमिनी लागवडीखाली आल्या आहेत. अनेकांनी भाजीपाला लागवडीवर भर दिल्याने स्थानिक भाजी उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या युवा शेतकऱ्यांना राज्य सरकारने सर्व प्रकारचे सहकार्य केले तर गोवा कृषी क्षेत्रात निश्चित स्वावलंबी होईल, असा विश्वास राज्यातील कृषितज्ज्ञ तसेच अनुभवी शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे.
का वळले युवक शेतीकडे
लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक उद्योगधंदे बंद पडले. स्थानिक युवकांच्या नोकऱ्या गेल्या. बेकार झालेल्या गोमंतकीय युवकांनी पुन्हा गोव्यात येणेच पसंत केले. लॉकडाऊनच्या काळात कृषी उत्पादने, भाजीपाला या गोष्टींना मोठी मागणी निर्माण झाली आणि याच संधीचा फायदा घेऊन अनेक युवकांनी गेली अनेक वर्षे पडीक असलेल्या जमिनी लागवडीखाली आणल्या. कमी वेळात फुलणाऱ्या भाज्यांचे पीक घेतल्यास त्यांना निश्चित चांगली बाजारपेठ मिळू शकते, हे लक्षात घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या भाज्या पिकवल्या. त्यांच्या उत्पादनाला कृषी खाते तसेच राज्य फलोत्पादन महामंडळानेही बाजारपेठ मिळवून दिली. त्यामुळे अनेक युवकांनी गेल्या तीन-चार महिन्यांच्या काळात नोकरीतून मिळणाऱ्या पगारापेक्षा दुप्पट आर्थिक कमाई केल्याचे राज्यभरातून दिसून आले आहे.
कृषी खाते, फलोत्पादनाचे प्रोत्साहन
कृषी खाते व फलोत्पादन महामंडळानेही लॉकडाऊनच्या काळात स्थानिक शेतकऱ्यांना विविध मार्गांनी प्रोत्साहन दिले आहे. भाजीची बियाणे ५० टक्के सबसिडीने देणे, कृषी अवजारांसाठी अनुदान, पंतप्रधान किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना आदींच्या माध्यमातून कृषी खात्याने कृषी उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले. शिवाय युवा शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, यासाठीही जागृती केल्याचे दिसून आले. फलोत्पादन महामंडळाकडून स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीला किलोमागे ८ रुपये अधिक दर देण्यात आला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आपले उत्पादन महामंडळाला देऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळविल्याचेही या काळात दिसून आले. मेहनत घेऊन प्रामाणिक काम केल्यास नोकरीपेक्षा शेतीतून अधिक उत्पन्न मिळविता येऊ शकते, हा आत्मविश्वास आता राज्यातील युवा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने कृषी क्षेत्राकडे वळेल, अशी प्रतिक्रिया विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून मिळत आहे.
उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री बाबू कवळेकर तसेच आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये युवा शेतकऱ्यांना विविध मार्गांनी प्रोत्साहन देत आहेत. राज्यात विक्री होईल अशा भाज्यांची लागवड करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्यास गोव्याला भाजीपाल्यासाठी इतर राज्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही, असा सल्लाही ते वारंवार देत आहेत. आता कृषी खात्याकडून आवश्यक आर्थिक सहाय्य मिळते. पण तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची व्यवस्था सरकारने केल्यास त्याचा युवा शेतकऱ्यांना आणखी फायदा होईल. त्यामुळे कृषी खात्याने अशा मार्गदर्शकांची नेमणूक करावी, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.