सत्तरीतील ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुविधा नाही

वाळपई इस्पितळावर ताण; सत्तरीत टीका उत्सवाला अल्प प्रतिसाद; पंच,सरपंच जागृती करण्यात अपयशी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

वाळपईः सत्तरी तालुक्यात गुळेली, ठाणे, केरी आणि अडवई अशी ग्रामीण आरोग्य केंद्रे आहेत. या चारही केंद्रांच्या सुसज्ज इमारती असताना तिथं कोविड लसीकरणाची सोय मात्र उपलब्ध केलेली नाही. या सर्व केंद्रांच्या आजुबाजुला अनेक गाव वसले आहेत. या लोकांना वाळपई सामाजिक आरोग्य केंद्रात जाण्याऐवजी, जर या ग्रामीण आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध झाली, तर ते सोयीचं ठरणार आहे. गावातील लोक, खास करून वयोवृद्ध तसंच ज्यांच्याजवळ वाळपई सामाजिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी गाडीची सोय उपलब्ध नाही, अशांसाठी या केंद्रावरली लसीकरण उपयोगाचं ठरेल. सत्तरी तालुक्यातील अनेक गाव हे वाळपई शहरापासून १५ ते २० किलोमीटरच्या अंतरावर आहेत. या अशा दूरवरील खेडापाड्यातून अनेकदा लोक वाळपई इस्पितळात लसीकरणासाठी येण्यास टाळाटाळ करतात.

हेही वाचाः अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. दिलीप धारगळकर

वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर मोठा ताण

वाळपई सामाजिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरणाचा मोठा ताण पडत आहे. अनेक डॉक्टर, कर्मचारी विनासुट्टी सलग काम करत आहेत. गोवन वार्ताशी खाजगीत बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली. तालुक्यातील गुळेली, ठाणे, अडवई आणि केरी या चार ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुविधा उपलब्ध केल्यास वाळपई आरोग्य केंद्रावरील ताण कमी होईल आणि गावागावातील लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय.

हेही वाचाः लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, मात्र विरोधासाठी विरोधी बोलू नये

सत्तरीत टीका उत्सवाला अल्प प्रतिसाद; पंच,सरपंच जागृती करण्यात अपयशी

सत्तरी तालुक्यात कोविड लसीकरण टीका उत्सवाला लोकांचा अल्प प्रतिसाद मिळालाय. लसीकरणाचं महत्व पटवून लोकांना टीका उत्सवाला नेण्यास तालुक्यातील पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्यांना अपयश आलं आहे. निवडणुकीच्यावेळी वयोवृद्धांना, दिव्यांगांना मतदान केंद्रावर नेण्यास हेच लोकप्रतिनिधी जातीने लक्ष देतात. तसे प्रयत्न मात्र लसीकरणाबाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होताना दिसत नाहीत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!