गोव्यात आरटीपीसीआर टेस्ट इतकी महाग का?

जे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राला जमलं, ते गोव्याला का नाही जमत?

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं थैमान घातलंय. राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री लोकांना चाचण्या करण्याचं आवाहन करत आहेत. मात्र सरकारी हॉस्पिटलमध्ये लोकांच्या चाचण्यांचे नमुने 8 दिवस मिळत नसल्याने संताप व्यक्त होतोय. दुसर्‍या बाजूला खासगी हॉस्पिटल्स आणि लॅबमधील चाचण्यांचे दर सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कोविडचा मुकाबला करणं अशक्य बनत चाललंय.

आरटीपीसीआर टेस्टसाठी दीड हजार रुपये!

केरळ सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत आरटीपीसीआर चाचण्यांचे दर 1 हजार 700 रुपयांवरुन थेट 500 रुपये एवढा कमी केला आहे. कोरोनाची लागण झाली आहे की नाही, यासाठी आरटीपीसीआर टेस्ट ही सर्वांत विश्वसनीय ठरते. केरळमध्ये 500 रुपयांत होणारी आरटीपीसीआर टेस्ट गोव्यात मात्र 1 हजार 500 रुपयांत केली जाते. त्यामुळे केरळ सरकार जर 500 रुपयांत टेस्ट करण्याचा निर्णय घेऊ शकतं, तर गोवा सरकार प्रायव्हेट रुग्णालयात किंवा लॅबमध्ये 500 रुपयांत आरटीपीसीआर चाचण्या करण्याचा आदेश का देऊ शकत नाही, असा प्रश्न सामान्य गोवेकर करत आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटकात चाचणी स्वस्तात

महाराष्ट्रात कोविड चाचणी अहवालासाठी गोव्याच्या तुलनेत खूप कमी रक्कम आकारली जाते. आरटीपीसीआर टेस्टसाठी 500 ते 800 रुपये आकारले जातात. तर अँटीबॉडी टेस्टसाठी 250 ते 550 रुपये आकारले जातात. कर्नाटकमध्ये आरटीपीसीआर चाचणी 800 रुपयांत केली जाते. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, गोव्यातच असं काय तंत्रज्ञान वापरलं जातं, की त्यामुळे खासगी इस्पितळात आरटीपीसीआर चाचणी अडिच हजार रुपये घेऊन केली जाते?

होम आयसोलेशन कीट मिळेनात…

सरकार होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन कीट देतं. हे कीट रुग्णांना त्या त्या भागातील आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार असल्याच सरकार सांगतं. मात्र हे कीट उपलब्ध होत नसल्याचा दावा अनेक रुग्णांनी केलाय. सरकारन होम आयसोलेशनमधील रुग्णांना वेळत कीट मिळण्याची सोय करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!