आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक हल्ला प्रकरणः गुन्हेगारांना लवकरच अटक करणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; क्राईम ब्रांचकडून तपास सुरू

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजीः आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्यातील इतर आरोपींना लवकरच अटक होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मुरगाव तालुक्यातील बायणा पुलाच्या ४ लेन फ्लायओव्हर तसंच रस्त्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुरगाव तालुक्याला भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

हेही वाचाः श्रीपादभाऊंना बंदरे, पर्यटन तर नारायण राणेंकडं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग

क्राईम ब्रांचकडून तपास सुरू

नारायण नाईक हल्ला प्रकरणाची केस अगोदरच क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आली आहे. मला क्राईम ब्रांच आणि पोलिस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि जो कोणी गुन्हेगार असेल तो लवकरात लवकर गजाआड होईल यात शंका नाही. एका संशयिताला अगोदरच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. इतरांचा तपास लवकरच लागेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणालेत. तसंच सध्या ज्या दोघांची नावं समोर आलीत त्यांच्याविरुद्ध पोलिस पुरावे गोळा करत असून आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचाः एकनाथ खडसे ‘ईडी’ कार्यालयात दाखल ; चौकशी सुरू

काय आहे प्रकरण?

सामाजिकी कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर लोखंडी रॉडने अज्ञातांनी येऊन हल्ला केला. यामध्ये नारायण दत्ता नाईक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी जीएमसीत आणण्यात आलं होतं. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, आता अधिक चौकशीतून एकाला अटक करण्यात आली होती.

हेही वाचाः म्हापसा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली; बुधवारपासून विक्रेत्यांना व्यवहार करण्याची मुभा

एका संशयिताला अटक

नारायण नाईक यांच्या हल्ल्याची सुपारी देणारा मुख्य संशयित सूत्रधार रामगोपाल यादव उर्फ करिया (वय ४०, रा. झुआरीनगर) याला पोलिसांना अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

हेही वाचाः गोवा मुक्तीला 60 वर्षं झाली तरीही हणखणे धनगर वाड्यावर रस्त्याचा पत्ता नाही

कोण आहेत नारायण नाईक

नारायण नाईक हे सामाजिक कार्यकर्ते असून ते आरटीआय एक्टिव्हिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी पंचायत क्षेत्रातील कोमुनिदाद जमिनीवर बड्या बिल्डरांनी केलेला कब्जा, बेकायदा बांधकामं आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून भानगडी उघडकीस आणल्या होत्या. या सगळ्या भानगडीत अप्रत्यक्षपणे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. त्यातूनच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!