रोनाल्डोची ‘फ्री किक’…फेव्हिकॉलचा ‘मजबूत जोड’ !

ना बॉटल हटेगी, ना मूल्य घटेगा..फेव्हिकॉलच्या जाहिरातीनं वेधलं जगाचं लक्ष !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो कपमध्ये पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवल्या आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. एकीकडे रोनाल्डोच्या या कृतीचं अनेकांकडून कौतुक होत असताना मार्केटमध्येही याचे पडसाद उमटले. रोनाल्डोच्या या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला तब्बल २९ हजार कोटींचा तोटा झाला. सोशल मीडियावर रोनाल्डोची चर्चा सुरु असताना फेव्हिकॉलने याचा फायदा घेत केलेल्या जाहिराताचीही सध्या जबरदस्त चर्चा सुरु झाली आहे. फेव्हिकॉलची ही क्रिएटिव्हीटी पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

तंदुरुस्तीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या ३६ वर्षीय रोनाल्डोने पत्रकार परिषदेत त्याच्या पुढय़ातील कोका-कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. ही कृती करताना रोनाल्डोने पोर्तुगीज भाषेत ‘‘एगुआ’’ म्हणजेच ‘‘पाणी प्या’’ असा संदेश दिला. रोनाल्डोचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाल आणि मीम्सचा अक्षरश: पाऊस पडायला सुरुवात झाली. फेव्हिकॉलने याच संधीचा फायदा घेत जाहिरात केली आहे. यामध्ये त्यानी पत्रकार परिषदेत टेबलावर फेव्हिकॉलचे दोन डबे ठेवल्याचं दाखवत ‘ना बाटल्या हटणार ना मूल्य हटणार’ अशी भन्नाट कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, रोनाल्डोच्या कृतीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या कोका कोलाने या घटनेवर प्रतिक्रिया देताना, काय प्यावं यासाठी प्रत्येकाची आपली आवड आहे. प्रत्येकाची चव आणि गरज वेगळी आहे, असं म्हटलं आहे. कोका कोला युरो कपच्या स्पॉन्सर्सपैकी एक आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यातही रोनाल्डोने कार्बन डायऑक्साइडयुक्त पेयांबाबतच्या आपल्या तीव्र भावना प्रकट केल्या होत्या. माझ्या मुलामध्ये महान फुटबॉलपटू बनण्याची क्षमता आहे. तो काही वेळा कोक पितो आणि कुरकुरीत पदार्थ खातो आणि त्यामुळे माझी चिडचिड होते, असे ट्वीट रोनाल्डोने केले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!