67 मृत्यूंची माहिती लपवलेल्या प्रकाराची चौकशी करा

पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः अपक्ष आमदार रोहन खंवटेंनी कोविडमुळे 67 मृत्यूंची माहिती लपविणाऱ्या त्या खासगी हॉस्पिटल्सची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासगी हॉस्पिल्समध्ये कोरोनाबाधितांवरील उपचाराची प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. कधी वाढीव शुल्कामुळे, तर कधी उपचारांनंतरही होणार्‍या मृत्यूमुळे खासगी हॉस्पिटल्स टीकेची धनी बनली. मात्र यातून बोध न घेतल्यामुळे राज्यातील काही खासगी हॉस्पिटलांचं बिंग फुटलं आहे.

हेही वाचाः पर्यटन पुन्हा लवकरच सुरू होण्याची जीटीडीसीला आशा

रोहन खंवटेंचं ट्विट

रोहन खंवटे ट्विट करताना म्हणालेत,  खासगी हॉस्पिटल्समध्ये 67 कोविड मृत्यूंची नोंद झाली नाही ही वस्तुस्थिती रोजची कोविड आकडेवारी सरकारी गरजेनुसार कमी केल्याच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या आरोपांमध्ये भर घालते. त्यामुळे या प्रकाराची कसून चौकशी आणि याविरुद्ध कारवाई ही झालीच पाहिजे.

काय आहे प्रकरण?

गेल्या 9 महिन्यांत तब्बल 67 जणांचा खासगी हॉस्पिटलात मृत्यू झाला, ज्याची माहिती उघड करण्यात आली नव्हती. ही माहिती आता 9 महिन्यांनंतर उघड झाल्यामुळे खासगी हॉस्पिटल्सची लबाडी उघड झालीय. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरलीये.

हेही वाचाः व्यवसायांसाठी ‘वी नेक्स्ट’ जनरेशन क्लाऊड फायरवॉल सोल्युशन्सची सुरुवात

हॉस्पिटल्सच्या नावाबाबत उत्सुकता

5 ऑगस्ट 2020 ते 22 मे 2021 या कालावधीत खासगी हॉस्पिटलात मृत्यू आलेल्या 67 कोरोनाबाधितांची आता नोंद करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला. ही हॉस्पिटल्स कुठली, त्यांची नावे काय, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण 2 हजार 840 जणांचा कोविडमुळे बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे 13 जणांचा मृत्यू झालाय. 10 जणांचा गोमेकॉत, तर तिघांचा दक्षिण गोवा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!