गुन्हा करण्याची शक्यता लक्षात घेऊन खंवटेंना केली होती अटक!

फेब्रुवारीतील घटनेवर पोलिसांचे खंडपीठात प्रतिज्ञापत्र; पुढील सुनावणी ८ डिसेंबरला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) आणि तक्रारदार प्रेमानंद म्हांबरे (Premanand Mhambre) यांच्या पक्षामध्ये राजकीय वैमनस्य आहे. यामुळे खंवटे गंभीर गुन्हा करण्याची शक्यता होती. म्हणूनच खंवटे यांना कायदेशीर सोपस्कार करून 5 फेब्रुवारीला रात्री उशिरा अटक केली होती, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस महासंचालकांतर्फे उत्तर गोवा जिल्हा अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांनी आमदार रोहन खंवटे यांच्या विरोधात 5 फेब्रुवारी 2020 रोजी सभापतींकडे मारहाणीची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार पर्वरी पोलिस स्थानकात पोहोचल्यानंतर त्याच मध्यरात्री खंवटे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईविरोधात आमदार खंवटे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आमदार खंवटे यांनी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पर्वरी पोलिस निरीक्षक, उपअधीक्षक एडविन कुलासो आणि निरीक्षक निनाद देऊलकर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर पोलिसांनी खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात याचिकादाराच्या आरोपांचे खंडन करत याचिका निकालात काढण्याची विनंती केली आहे. आता खंडपीठाने याप्रकरणी मुख्य सचिवांना २७ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.

गुन्हा रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका

आमदार खंवटे यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेला वरील गुन्हा रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिकाही खंडपीठात दाखल केली आहे. त्या याचिकेत त्यांनी राज्य सरकार, पर्वरी पोलिस निरीक्षक आणि तक्रारदार प्रेमानंद म्हांबरे यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेत त्या दिवशी म्हाबरे यांची विधानसभेत भेट झाल्याचे नमूद केले आहे. परंतु, त्यावेळी म्हांबरे यांनी आपल्याशी हातमिळवणी करून, सुखद गोष्टींची देवाणघेवाण केली, त्यानंतर म्हांबरे स्वतःच्या मार्गाने‌ निघून गेले. त्यावेळी माझ्याबरोबर माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे चालत होते, असा दावा खंवटे यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा बनावट असल्याचे सांगत, तो रद्दबातल करण्याची मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवर 7 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

याचिकेतील मुद्दे… 

1 ‘पोलिस मॅन्युअल’ नसल्यामुळे पोलिस त्यांना हवी तशी कारवाई करतात. पर्वरी पोलिसांनी राजकीय दबावाखाली सूडभावनेने, बेकायदेशीर मला अटक केली.

2 भविष्यात असे होऊ नये व तसेच राज्यातील सर्वच नागरिकांना कायद्याचे संरक्षण मिळावे, यासाठी सदर प्रकरणात खंडपीठाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

3 भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांनी आमदार रोहन खंवटे यांच्या विरोधात 5 फेब्रुवारी 2020 रोजी सभापतीकडे तक्रार दाखल केली होती.

4 सात वर्षांहून कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात वॉरंट शिवाय अटक करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता 41 आणि 41 ए कलमांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

म्हांबरे यांच्या तक्रारीचा इतिहास

1 या तक्रारीत आमदार खंवटे यांनी विधानसभेच्या आवारात 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता आपला हात पिरगळला व धमकी दिली, असे नमूद केले होते.

2 ती तक्रार सभापतींनी पुढील कारवाईसाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात पाठवली होती. त्यानंतर ती पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार नोंद झाली होती.

3 पर्वरी पोलिसांनी खंवटे यांच्याविरुद्ध प्रथम भारतीय दंड संहितेच्या कलम 341१ व 323 अंतर्गत गुन्हा नोंद करून म्हांबरे यांची वैद्यकीय तपासणी केली होती.

4 नंतर पोलिसांनी कलम 506 जोडून त्यानंतर सभापतींच्या परवानगीने मध्यरात्री दीडच्या सुमारास खंवटे यांना अटक केली व मध्यरात्री 2.30 वाजता जामिनावर मुक्त केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!