दिव्यांग मुलीला स्वावलंबी बनवण्यासाठी जन्मदात्याचा एक प्रयोग असाही…

साडेबारा हजारात बनवला रोबोट; ममत्व अन् कल्पकता लावली पणाला

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः आपल्या पोटी सुदृढ मूल जन्माला यावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण काही अपत्य जन्मापासूनच दिव्यांग असतात. जन्मदात्यांसाठी तो पोटचा गोळा असतो. त्याला ते जीवापाड जपतात. त्याच्या संगोपनासाठी ते कुठलीच कसर ठेवत नाहीत. आपल्या दिव्यांग मुलीसाठी फोंड्यातील एका सह्रदयी पित्याने चक्क रोबोट बनवलाय. सध्या हा या परिसरात चर्चेचा विषय बनलाय.

…अन् बिपीनमधला अभियंता जागा झाला

दत्तगड-बेतोडा, फोंडा येथे दहा बाय दहाच्या झोपडीवजा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या बिपिन कदमची ही कथा. सतरा वर्षांपूर्वी जन्मलेली प्राजक्ता जन्मताच दिव्यांग होती. डोळे, कान, नाक आहे म्हणून तिला मनुष्य म्हणायचं. जन्माला आल्यापासून खाट हेच तिचं जीवन. बिपिन व त्याला पत्नीने मुलीच्या संगोपनासाठी कंबर कसली. तिला उचलून नेऊन आंघोळ घालणं, तिला जेवायला भरवणं, तिचे लाड करणं, तिला काय हवं नको ते पाहणं, सर्वकाही आनंदाने कदम माता-पिता करतायत. आमच्या नंतर मुलीचं काय होणार, ही एकच चिंता बिपिन यांना कायमची सतावायची. अडचणीच्या वेळी दोघांनाही एकदम बाहेर राहावं लागलं तर मुलीला कोण भरवणार, या चिंतेतून बिपीनमधला अभियंता जागा झाला.

असा बनवला रोबोट

मूळचा कुडाळचा बिपीन फक्त दहावी शिकलेला. सोबत कसलंही तांत्रिक ज्ञान नसताना फक्त ममत्व आणि कल्पकतेच्या जोरावर गरज ही यशाची जननी असते हे बिपीन यांनी खरं करून दाखवलं आणि साकारला मुलीला घास भरवणारा ‘रोबोट.’ परंतु सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. हाती तुटपुंजा पगार, पण आहे त्या पगारातून पै-पै वाचवून बारा हजार रुपये जमवले. त्या पैशातून रोबोटसाठी लागणारं साहित्य आणलं. शक्य होत असेल तिथे टाकाऊ सामान वापरलं. अथक प्रयत्नांना मेहनतीची व कल्पकतेची जोड देत मुलीला घास भरवणारा रोबोट तयार केला.

कसा काम करतो रोबोट?

त्या रोबोटला चमचा आहे. रोबोटच्या खाली तीन बशा ठेवण्यात आल्यात. त्यामध्ये भात, वरण व भाजी ठेवली जाते. रोबोटला एक माईक जोडलेला आहे. त्या माईकमध्ये मुलीने भात असं म्हणतात तो चमचा भात असलेल्या बशीत जातो. अलगद एक घास उचलून तो त्या मुलीच्या तोंडात ठेवतो. मुलीला भात – वरण कालवून हवं असेल तर तो रोबोट ते पण काम करतो. त्यामुळे मुलीला निदान पोटभर अन्न घेण्याइतपत स्वयंपूर्ण करण्यात बिपिनना यश आलंय.

हेही वाचा – Special report | Sand Issue | भरदिवसा तलवारी हातात घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कुणाचा वरदहस्त?

पंतप्रधानांना द्यायचा आहे प्रस्ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर आपला प्रस्ताव ठेवाचा आहे, असं बिपीनचं मत आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहारही केलाय. परंतु त्याला अजून कुणाकडूनही बोलावणं आलेलं नाही. निदान ही बातमी वाचून गोव्याचे मुख्यमंत्री व बिपीन मूळचा कुडाळचा असल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी, त्याला सहकार्य करावं, अशी त्याची इच्छा आहे.

दिव्यांग मुलांसाठी बनवायचेत असंख्य रोबोट

रोबोट तयार करायला फक्त साडेबारा हजार रुपये खर्च आलाय. हातात पुरेसे पैसे नसल्याने कमी दर्जाची उपकरणं वापरलीयेत. दिव्यांग असलेली असंख्य मुलं आमच्या अवतीभवती आहेत. बिपिनला आता त्या मुलांची काळजी लागलीये. त्या मुलांना मायेने घास भरविणारे अनेक रोबोट त्याला तयार करायचेत. परंतु त्याला दिशा सापडत नाहीये. गोव्यातल्या काही मंत्रीमहोदयांना तो भेटलाय. एका केंद्रीय मंत्र्यांपर्यंत त्याने आपला रोबोट नेला. परंतु त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!