वास्कोत थरारनाट्य; दोघांना अटक

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी
वास्को: वास्कोत गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखे बाहेरील एटीएममध्ये आलेल्या एका तरुणाकडून त्याचे एटीएम कार्ड हिसकावून पोबारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना जागरुक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
सोमवारची घटना; दोघा संशयितांना अटक
सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रवी होश्यारसिंग (वय 30, सुलतानपूर, नवी दिल्ली) आणि अंकूर रमेशकुमार (वय २३, हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे.
एटीएम हिसकावून काढला पळ
उपासनगर येथे राहणारा प्रभू कंचन गौंडार (वय २०) हा बँकमधून त्याचे नवीन एटीएम कार्ड घेऊन बाहेर आल्यानंतर तो एटीएम कक्षात गेला. तिथे तो आपल्या एटीएमचा नवीन पिन तयार करत असताना रवी आणि अंकूर त्याच्याजवळ गेले. दरम्यान, प्रभू याने पिन तयार केल्यानंतर एटीएम मशिनमधून बाहेर काढत असताना अंकूर याने ते हिसकावून रवीकडे दिले आणि तिथून पळ काढला. यावेळी प्रभूबरोबर आलेल्या महिला नातेवाईकाने आरडाओरड केली. त्यावर परिसरात उभ्या असणाऱ्या लोकांनी पाठलाग करून त्यांना पकडून चोप दिला.

पोलिसांकडून संशयितांना अटक
या प्रकार झाल्यानंतर वास्को पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंकुर आणि रवीला या दोघा संशयितांना अटक केली आहे. सध्या ते पोलिस कोठडीत अजून पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.