VIDEO | अभिमानास्पद! साखळीतील रिचाची आभाळाला गवसणी

केवळ २१ व्या वर्षी कमर्शियल विमान पायलट होण्याचा मान मिळविला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: साखळी येथील लवू आणि हेतल गोवेकर यांची मुलगी रिचा गोवेकर यांनी वयाच्या केवळ २१ व्या वर्षी कमर्शियल विमान पायलट होण्याचा मान मिळविला आहे. लहानपणापासून असलेला आत्मविश्वास, चिकाटी आणि अभ्यासात केलेल्या परिश्रमाच्या जोरावर रिचाने या पदापर्यंत मजल मारली आहे. लहान वयात मिळविलेल्या या मोठ्या पदवीमुळे आज त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रिचाच्या या प्रवासाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ‘गोवन वार्ता’च्या प्रतिनिधीने रिच्यासोबत खास बातचित केली आहे.

लहानपणापसूनच आकाशातील तारे, चंद्र, सूर्याचा अभ्यास करण्याची आवड

मला लहानपणापसूनच आकाशातील तारे, चंद्र, सूर्य यांविषयी अभ्यास करण्याची आवड होती. या विषयात मी जास्त रमत होते. चौथीत असतानाच मला याची आवड निर्माण झाली. आठवीत गेल्यानंतर कळले मुलीही पायलट होऊ शकतात. त्याचवेळी ‘निरजा’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातूनही मला प्रोत्साहन मिळाले. त्यावेळी मनात निश्चय केला की, पायलट होण्याचा फक्त विचार करून चालणार नाही त्यासाठी कठोर परिश्रम घेणे महत्त्वाचे होते. मी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर या क्षेत्रात प्रवेश केला, असे रिचा यांनी सांगितले.
डिचोली येथील शांतादुर्गा विद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गोव्यात हे प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. त्यासाठी मी महाराष्ट्रातील बारामती येथे जाऊन हे प्रशिक्षण घेतले. यासाठी खास चाचणी परीक्षा असते. यात गणित, विज्ञान आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे अाहे. तसेच मेडीकल तपासणी केली जाते. या प्रशिक्षणासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागतो. पण, करोना असल्याने मला तीन वर्षांचा कार्यकाळ लागला. यात लिखित तसेच व्यावहारिकरीत्या परीक्षा आणि विमान कसे उडवितात याचे प्रशिक्षण दिले जाते. कोर्सच्या शेवटच्या कालावधीत पुन्हा मेडीकल तपासणी केली जाते. त्यानंतर ही​ पदवी प्राप्त होते, असे रिचा यांनी सांगितले.

पालकांकडून पूर्ण पाठिंबा

सहसा पालक आपल्या मुलींना अशा प्रशिक्षणासाठी पाठवत नाहीत. पण, माझ्या वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी उंच उंच भरारी घे असं म्हणत प्रत्येकवेळी मला प्रेरणा दिली. त्याच बळावर मी आज इथपर्यंत पोहचले आहे. आई-वडिलांच्या सहकार्याशिवाय मला हा पल्ला गाठणं कठीण होतं. मुलींना असं प्रशिक्षण घेण्याची आवड असते. पण, काही आर्थिक अडचणीमुळे ते करणे शक्य होत नाही. खासगी कोर्स आहेत. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात.

प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांच्या कार्यकाळ

हे प्र‌शिक्षण पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांच्या कार्यकाळात सुमारे ६० लाख रुपये एवढा खर्च आला. जर मनाची इच्छा असेल आणि आर्थिक स्थिती चांगली असेल तर पालकांनी आपल्या मुलांना उंच उंच भरारी घेण्याचं त्यांचं स्वप्न साकार करावं, असं रिचा गोवेकर सांगते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!