जमीन मालकीच्या लढ्यात ‘आरजी’ सत्तरीवासीयांसोबत – मनोज परब

जमीन मालकीचा प्रश्न फक्त सत्तरीतच नसून गोव्यातील प्रत्येक भागात असल्याचं मनोज परब यांनी सांगितलं.

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः वाळपईत सुरू असलेल्या ऐतिहासिक उठावाला रीव्होल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी पाठिंबा दर्शवलाय. यावेळी ते स्वतः वाळपईत हजर होते. जमीन मालकीच्या लढ्यात रीव्होल्यूशनरी गोवन्स सत्तरीवासीयांसोबत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.

जमीन मालकीप्रश्न गोव्यातील प्रत्येक भागात

आज वाळपईत सुरू असलेल्या सत्तरीवासीयांच्या ऐतिहासिक उठावात रीव्होल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी सत्तरीवासीयांशी संवाद साधला. जमीन मालकीचा प्रश्न फक्त सत्तरीतच नसून गोव्यातील प्रत्येक भागात असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. मोपा भागातही जमीन मालकीप्रश्न अशाच प्रकारे सुरू आहे. मोपावासीयांची १ कोटी चौ.फू जमीन विमानतळासाठी गेली आहे. तरीही सरकारचा जमिनींवरील हल्ला अजूनही सुरूच आहे आणि भविष्यातही तो असाच सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारवर दबाव आणा

जमीन मालकीप्रश्नी आवाज उठवण्यासाठी सत्तरीवासीयांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, याची जाणीव रीव्होल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी करून दिली. प्रत्येकाने वेगवेगळं कोर्टात जाऊन हा जमीन मालकीप्रश्न सुटणारा नाही. हा प्रश्न केवळ कॅबिनेटमध्येच मिटू शकतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो.

लागेल ती मदत करू

जमीन मालकीप्रश्नी सत्तरीवासीयांना लागेल ती मदत करण्यास रीव्होल्यूशनरी गोवन्स तयार असल्याचं मनोज परब म्हणाले. तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध निडरपणे पुढे सरून आवाज उठवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!