रिव्हॉल्यूशनरी गोवन्स हरित गोव्यासाठी सज्ज

अनेक गावात राबवली 'ग्रीन गोवा इनिशिएटिव्ह' मोहीम

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: रिव्हॉल्यूशनरी गोवन्सने आपल्या ‘ग्रीन गोवा इनिशिएटिव्ह’ या मोहिमेंतर्गत यंदा २० हजार नवीन रोपट्यांचं लक्ष्य साधून, गोवा हरित बनवण्यासाठी संपूर्ण गोव्यात वृक्षारोपणास प्रारंभ केला. वृक्षारोपणाची सुरुवात समुद्रकिनाऱ्यावरून झाली असून आता ताळगाव, नेरूळ, कारापूर, लाटंबार्से, डिचोली, मये, तिवरे, माशेल, सावईवेरे अशा अनेक गावात ही मोहिम राबवली जात आहे.

हेही वाचाः पारोडा गावात सोमवारी तुफान राडा

ग्रामस्थांना मोफत रोपट्यांचं वाटप

गोवा हरित बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा संघ नेहमीच तत्पर असतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण या मोहिमेत सहभाग घेऊन नापीक जागेवर वृक्षारोपण करतोय, तसंच ग्रामस्तांना मोफत रोपट्यांचं वाटपही चालूच आहे.

हेही वाचाः ‘समृद्ध गोवा’ चळवळीत सहभागी व्हा

जंगल वाढीसाठी प्रोत्साहन देणं हा मुख्य हेतू

ग्रीन गोवा इनिशिएटिव्ह मोहिमेचा महत्त्वाचा हेतू म्हणजे जंगल वाढीसाठी प्रोत्साहन देणं आणि लोकांना झाडं लावण्यासाठी तसंच त्यांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करणं हा आहे. कारण वर्तमानात प्रगतीच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड चालू आहे आणि त्यानंतर पुन्हा नवीन रोपटी लावण्याची कुणी दखल घेत नाही. आता जागे होऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण केलं पाहिजे आणि हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी यंदा २० हजार रोपट्यांची लागवड नक्कीच करू, असे विचार या संघाचे अध्यक्ष विरेश बोरकर यांनी या मोहिमेद्वारे मांडले.

हेही वाचाः आजोशी धबधब्यावर होणाऱ्या गर्दीमुळे चिंता वाढली

आम्ही वृक्षारोपणाची मोहीम चालूच ठेवणार

जेव्हा आपण मुलभूत सुविधांच्या विकासाबद्दल बोलतो, तेव्हा सर्वात जास्त हानी ही पर्यावरणाची होते. मोठ मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो झाडे तोडण्यात येतात आणि त्या बदल्यात दुसरी झाडेही लावली जात नाहीत. पण आम्ही ही वृक्षारोपणाची मोहीम चालूच ठेवणार असल्याचं श्रीकृष्णा परब म्हणाले.

हेही वाचाः टीआरपी घोटाळा : अर्णब यांच्या नावासह दुसरं आरोपपत्र दाखल !

मोहिमेत सहभागी व्हा

क्रांतिकारी कै. यतीन वारंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आलं. कारण या मोहिमेची पायाभरणी याच क्रांतिकाराच्या घरात करण्यात आली होती आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावात १ हजार रोपटी लावली. त्यांनी या मोहिमेसाठी धडपडणाऱ्यांचं कौतुक केलं आणि पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करत प्रत्येक गोंयकाराला विनवणी केली आहे की त्यांनीही ग्रीन गोवा इनिशिएटिव्हमध्ये सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं, असं प्रियोळ गावातील मोहिमे दरम्यान विश्वेश नाईक बोलताना म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!