आना फोंत उद्यानाच्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करा

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांची मागणी; गुरुवारी केली आना फोंत उद्यानाची पहाणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः आना फोंत उद्यान हे मडगाव शहराचे भुषण आहे. या जागेवर एक बहुमजली इमारत बांधण्याचा डाव काहीजणांनी आखला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या पाठिंब्याने सदर प्रस्ताव रद्द करण्यात मी यशस्वी झालो आणि हे उद्यान तयार झालं. सरकारने आना फोंत उद्यानाच्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

हेही वाचाः राज्यातील कोविड मृत्यूंसाठी सरकारच जबाबदार

गुरुवारी केली पहाणी

मडगावच्या आमदारांनी गुरुवारी वन खात्याचे उप वन संरक्षक पि. लि. एटे,  सहाय्यक वन संरक्षक ज्ञानेश्वर कुडाळकर, आरएफओ युसेबियो ब्रागांझा, वन रक्षक संदिप गावडे तसंच स्थानीक नगरसेवक सगुण नायक, आना फोंत उद्यान देखभाल समितीचे निमंत्रक ॲड. माधव बांदोडकर, समाजसेवक सिद्धांत काणेकर यांच्या समवेत आना फोंत उद्यानाला भेट देऊन पाहणी केली.

उद्यानाची दुरुस्ती आवश्यक

आना फोंत उद्यानाचं वैभव परत मिळवून देण्यासाठी वन खात्याने ताबडतोब पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. येथील झरीचं पाणी साचून राहिल्यानं दुषित झालं आहे. ते प्राधान्यक्रमाने स्वच्छ करणं गरजेचं आहे. झाडं आणि गवत कापणं, व्यासपीठ दुरूस्त करणं तसंच कपडे बदलण्यासाठीच्या खोल्यांची दुरूस्ती करणं, संगीत कारंज्यांची दुरूस्ती करून ते पुर्नकार्यांवित करणं अशी कामं हाती घेणं गरजेचं आहे, असं कामत म्हणाले.

2012 नंतर सरकारकडून सहकार्य बंद

गोव्यातील पहिला संगीत कारंजा हा आना फोंत उद्यानात बसविण्यात आला होता. या उद्यानाला भेट देणारे लोक आणि खास करून लहान मुलांना या उद्यानाच्या जागेच्या एकंदर रचनेमुळे सुरक्षितता लाभते. ॲड. माधव बांदोडकर आणि इतर या उद्यानाचे व्यवस्थापन सांभाळत होते. परंतु, 2012 नंतर सत्तेत आलेल्या सरकारने त्यांना सहकार्य देण्याचं थांबवल्याने आज आना फोंत उद्यानाची दुर्दशा झाली असल्याची खंत कामतांनी व्यक्त केली.

अशा प्रकल्पांत राजकारण आणू नका

आना फोंत उद्यानासारखे प्रकल्प लोक आणि लहान मुलांना विरंगुळा देतात. सरकारने अशा प्रकल्पांच्या देखभालीत राजकारण आणू नये. सरकारला सुबुद्धी येईल आणि या उद्यानाला लवकरच पुर्नवैभव प्राप्त होईल अशी आशा मी बाळगतो, असं कामत म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!