नवीन योजना राबवण्यापूर्वी उपद्रव करणाऱ्या रानटी प्राण्यांचा प्रश्न निकाली काढा

साहिल नारुलकर याची सरकारला विनंती; गव्यांकडून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’चा मंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गावागावात पोहोचवताना दिसतात. तरुणांनी शेतीकडे वळून आत्मनिर्भर बनलं पाहिजे असं मुख्यमंत्री सांगतात. त्यासाठी विविध कृषी योजनादेखील मुख्यमंत्र्यांकडून राबवल्या जातायत. मात्र या नवीन योजना राबवण्यापूर्वी उपद्रव करणाऱ्या प्राण्यांचा निकाल लावावा, अशी विनंती हाळी चांदेल येथील साहिल नारुलकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने केली आहे. दीड हजार चौ.फू. जागेतील त्याचा भाजीचा मळा गुरुवारी रात्री गव्या रेड्यांनी उद्ध्वस्त केला आहे.

गव्याकडून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

कोविडच्या काळात शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. सध्या शिक्षण ऑनलाईन सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे बराच मोकळा वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करताना हाळी – चांदेल येथील साहिल नारुलकर या तरुणाने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. दीड हजार चौ.फू. जागेत त्याने काकडी आणि भेंडीची लागवड केली. बरीच मेहनत घेऊन, सेंद्रिय खताचा वापर करून त्याने शेती फुलवली. मात्र पीक तोडणीसाठी तयार असताना गुरुवारी रात्री गव्या रेड्यांनी त्यांच्या शेतात हैदोस घालत पिकाची नाशाडी केली. यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

अगोदर या प्राण्यांचा प्रश्न निकाली काढा

सरकार वारंवार युवकांना शेतीकडे वळण्याचं आवाहन करतंय. कृषी क्षेत्राच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून विविध योजना सरकारकडून राबवल्या जातायत. अनेक तरुण उत्साहाने शेतीकडे वळून मेहनत घेत शेती फुलवतायत. मात्र रानटी जनावरे त्यांच्या मेहनतीचं फळ काही त्यांना चाखू देत नाहीत. रानटी जनावरांकडून केल्या जाणाऱ्या शेतीच्या या नुकसानाकडे सरकार डोळेझाक करत असल्याचं चित्र दिसतंय. नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची मदत करतंय हे खरं, पण मिळणारी रक्कम ही वाट खर्चासही पुरणारी नसते. योजना आणल्या म्हणून कृषी विभाग खरंच प्रगत होणार का? पेडण्यात राज्य प्राणी म्हणवला जाणारा गवाच शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देतोय. सरकारने नवीन योजना राबवण्याअगोदर या प्राण्यांचा निकाल लावावा, अशी विनंती साहिलने सरकार दरबारी केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!