गोव्यात आता ‘आत्मनिर्भर जेल’ संकल्पना

कोलवाळ सेंट्रल जेलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेची घोषणा केलीय. ह्याच धर्तीवर गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारित कस्टडीबद्दलची धारणा आता तुरुंग प्रशासनाने बदलली आहे. तुरुंगातील व्यक्तींचं रुपांतर सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह व्यक्तीत करण्यासाठी आता तुरुंग प्रशासन ‘आत्मनिर्भर जेल’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करत असल्याची माहिती सहाय्यक कारागृह महानिरीक्षक आशुतोष आपटे यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग, नॉन-कन्व्हेन्शनल/सौर ऊर्जा संवर्धन आणि वापर, औषधी आणि इतर महसूल उत्पन्न लागवड, बेकरीचं व्यावसायिक उत्पादन, सुतारकाम आणि शिवणकाम वस्तू, गोशाळा आणि डेअरी फार्मिंगची स्थापना करण्यात येईल. ‘आत्मनिर्भर जेल’ या मोहिमेतून प्रत्येक हाताला काम मिळेल, ज्यामुळे त्यांना वेतन आणि शिक्षा दोन्ही मिळतील. घरगुती उपक्रमांच्या माध्यमातून उपजीविका कमावण्याचं कौशल्य शिकून ते सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह व्यक्ती बनतील, असंही आपटे म्हणाले.

कोलवाळ सेंट्रल जेलमध्ये प्रजासत्ताक दिन

बार्देश तालुक्यातील कोलवाळ येथे सेंट्रल जेलमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तुरुंगातील सर्व कैद्यांच्या वतीने कैदी ए. के. जयकुमारा याने संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना ‘आत्मनिर्भर जेल’ मोहिमेला सर्व कैद्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं

कार्यक्रमाला कोण कोण होते उपस्थित?

प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत हरिजन आणि सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर, उमेश सावंत, महेश फडते, कृष्णा उसगावकर, मुकुंद गावस, जेलर, नऊ पावणे, विलास परब आणि इतर सहाय्यक जेलर्स, हेड गार्ड्स आणि तुरुंग रक्षक यांच्यासह इतर तुरुंग अधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय राखीव बटालियनचे पोलीस इन्स्पेक्टर अमित बोरकर आणि त्यांचे सशस्त्र पोलिसांचं पथकही उपस्थित होतं. त्यांनी राष्ट्रध्वजाला शस्त्र सलामी दिली. एस्कॉर्ट पोलीस, लेडीज आयआरबीएन, गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सुरक्षा रक्षक आणि होमगार्ड यांनी परेड केली. तुरुंगातील कैदी या कार्यक्रमात सहभागी झाले. ध्वजारोहणानंतर श्री. आपटे यांनी तुरुंग सहाय्यक श्री. पेडणेकर आणि पीएसआय आयआरबीएन श्री. दत्तप्रसाद नांदडकर यांच्या मदतीने परेडची पाहणी केली.

सहाय्यक कारागृह महानिरीक्षक आशुतोष आपटे म्हणाले…

सहाय्यक कारागृह महानिरीक्षक आशुतोष आपटे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषा, प्रथा, परंपरांमध्ये विविधता असलेल्या राष्ट्राचं शासन करणं हे एक मोठं आव्हान असतं. विविधतेतील एकता टिकवून ठेवण्यासाठी संविधान निर्मात्यांनी अतिशय कौशल्याने संविधानाचा मसुदा तयार केला आहे. कायदा, नियम आणि इतर मार्गदर्शक पुस्तिका आणि तत्त्वांनुसार तुरुंगाचा कारभार चालवला जातो, असंही त्यांनी सांगितलं.

देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण

तुरुंगातील कैदींनी देशभक्तीपर गीतं सादर केली. बाबी फाळे, रमेश बागवे, विलास कुंकळकर, अंकुश गावडे, पांडुरंग पेडणेकर यांनी ‘हे राष्ट्र देवतांचे’ हे मराठी देशभक्ती गीत सादर केलं, तर जेलर विठ्ठल गावस यांनी ‘जग हे बंदिशाळा’ हे मराठी गीत गायलं. विष्णुदास परब आणि प्रकाश नागवेकर, मध्यवर्ती कारागृहातील संगीत शिक्षक या दोघांनी गीत गायनात साथीदार म्हणून भूमिका बजावली. कैदी अमितकुमार दास आणि मिथुन यांनीही बॉलिवूड शैलीत एक छोटंसं भाषण दिलं. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी या भाषणाचं कौतुक केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!