होलांत समुद्र किनाऱ्यावरील संरक्षक भिंत त्वरित दुरुस्त करा

स्थानिकांची मागणी; भिंती दुरुस्त न केल्यास किनाऱ्यावरील पोर्तुगीजकालीन घरांचं होणार नुकसान

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः इसोरशी क्षेत्रात येणाऱ्या होलांत समुद्र किनाऱ्याजवळील सोमवारी स्थानिक जमले आणि सरकारने हस्तक्षेप करून ताबडतोब तौक्ते चक्रीवादळात कोसळलेली संरक्षक भिंत दुरुस्ती करण्याची मागणी केली.

सरकारचं पूर्ण दुर्लक्ष

तौक्ते चक्रीवादळानंतर अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाही. तसंच कोसळलेली भिंत दुरुस्ती करण्याची इच्छा दाखवली नाही. याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा दावा वेळसांव पंचायतीचे माजी सरपंच लॉरेन्स परेरा यांनी केला.

संबंधित अधिकाऱ्यांना दिलीये कल्पना

दरम्यान प्रभाग पंच नंदीता दयाळ यांना संपर्क केला असता त्यांनी रहिवाशांनी केलेल्या दाव्यांना नाकारलं. त्या म्हणाल्या, चक्रीवादळा दरम्यान घटना घडली होती आणि त्वरित राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना याविषयी ताबडतोब कळवण्यात आलं. चक्रीवादळाच्या दोन दिवसांनंतर कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणांनी या भागाला लगेच भेट दिली होती आणि आवश्यक  प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना हा विषय त्वरित पूर्णत्वास नेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अन्यथा पोर्तुगीजकालीन घरांचं होणार नुकसान

या जागेत पोर्तुगीज काळातील जुनी घरं आहेत. संरक्षक भिंतींची जर लगेच दुरुस्ती केली नाही, तर येथील घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा आणि कार्य हाती घ्यावं. कारण होलांत समुद्र किनारादेखील एक पर्यटन स्थळ आहे, असं परेरा म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!