स्थानिकांचा विरोध असल्यास तरंगत्या जेटीचं स्थलांतरण

बंदर कप्तान मंत्री मायकल लोबोंची स्पष्टोक्ती

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः जल वाहतूकीच्या दृष्टीकोनातून आम्ही नदीत तरंगत्या जेटी उभारत आहोत. आतापर्यंत तीन जेटी उभारून तयार आहेत. स्थानिकांचा यास विरोध असल्यास संबंधित जागेतून सदर जेटीचं इतरत्र स्थलांतर केलं जाईल, असं बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले. कळंगुटमधील शेतकर्‍यांसाठी पंचायतीतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या नवीन ट्रॅक्टरचं शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचाः रेस्टॉरंट्स, ब्यूटी पार्लरही बँकेकडून कर्ज काढू शकणार

लोकांशी चर्चेला तयार

शापोरा नदीत उभारलेल्या तरंगत्या जेटीला शिवोली आणि चोपडेतील स्थानिकांसह पंचायत मंडळ तसंच पारंपरिक मच्छिमार बांधवांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रश्नी मंत्री लोबो यांनी वरील विधान केलं. गरज भासल्यास आम्ही लोकांशी चर्चेला तयार आहोत. या तरंगत्या जेटीचं कायमस्वरुपी बांधकाम नाही. जल वाहतूकीच्या दृष्टीकोनातून भविष्याचा विचार केला जात आहे. कॅटमारन बोटसाठी या जेटी असून स्थानिकांसह देशी-विदेशी नागरिक याचा लाभ घेऊ शकतील.

हेही वाचाः कोवॅक्सिन, स्पुतनिक वी नको, परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन घ्यावं

कॅसिनो आणण्याचा डाव नाही

कॅप्टन ऑफ पोर्टने पणजी, जुने गोवा आणि इतरत्र या जेटी उभारल्या आहेत. सध्या पाच पैकी एका जेटीला विरोध झाला आहे. सदर जेटीचं इतरत्र स्थलांतर केलं जाईल. याविषयी स्थानिक आमदार, पंचायत आणि भागधारकांशी चर्चा केली जाईल.  बंदर कप्तान खाते किंवा सरकारने सध्या कोणत्याच जहाज किंवा कॅसिनो जहाजाला या तरंगत्या जेटीजवळ नांगरण्यास परवानगी दिलेली नाही. असे सांगून या जेटी मागे कॅसिनो आणण्याचा डाव असल्याची निर्माण झालेली शक्यता मंत्री लोबो यांनी नाकारली.

हेही वाचाः VIDEO VIRAL: द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

जेटी केवळ कॅटमारन बोटींसारख्या छोट्या जहाजांसाठीच

ही जेटी केवळ कॅटमारन बोटींसारख्या छोट्या जहाजांसाठीच आहे. कॅटमारन बोटमध्ये 60 ते 80 प्रवाशांची क्षमता असते. तरंगत्या जेटीसाठी कॅप्टन ऑफ पोर्टने जुने गोवे, पणजी, मिरामार, शिवोली आणि हळदोणा या जागांची निवड केली आहे. पण जेटीला हरकत असल्यास आम्ही ती दुसर्‍या जागी नेऊ. केंद्राकडून जेटीसाठी 12 कोटी रुपये मिळाले आहेत. ही सुविधा स्थानिकांसह सर्वांसाठी सोयीस्कर आहे. भविष्यात नदी पात्रातून ये-जा करण्यास ही सुविधा उपयोगी पडेल.

हेही वाचाः 100 टक्के लसीकरण केलेलं पहिलं राज्य होण्याचं गोव्याचं उद्दिष्ट

लोकांना शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न

दरम्यान कळंगुट ग्रोईंग ग्रीन या उपक्रमांतर्गत कळंगुट पंचायतीतर्फे उपलब्ध केलेल्या ट्रॅक्टरचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन करून मंत्री लोबो म्हणाले, 1980च्या दशकानंतर कळंगुटवासी शेती व्यवसाय सोडून पर्यटन व्यवसायाकडे वळले. पण पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करून लोकांना शेतीकडे वळवलं आहे. यासाठी लागणारी मदत आम्ही शेतकर्‍यांना पुरवणार, असा विश्वास लोबोंनी दिला.

हेही वाचाः भाऊचं आगमन झालं…अवघं कोविड सेंटर आनंदानं फुललं !

येत्या 12 जून पर्यंत कळंगुटमधील सर्व शेत जमीन भात लागवडीसाठी नांगरून तयार केली जाईल, असं सरपंच शॉन मार्टिन्स यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!