गोमंतक विश्व हिंदू परिषदेकडून पूरग्रस्त भागांत मदतकार्य

वरिष्ठ अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना पाठवून पुरग्रस्त भागांतील घरांचा सर्व्हे करण्याची सरकारला विनंती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः 22 आणि 23 जुलैला गोव्यात धुव्वाधार पाऊस झाला‌. 23 रोजी पश्चिम घाटात ढग फुटी सारखा पाऊस झाल्यामुळे गोव्यातील अनेक नद्यांना पूर आला आणि नदीकाठच्या घरांमध्ये अचानक पाणी घुसलं. त्यामुळे अनेक घरातील सामानाची नासधूस झाली. काही मातीची घरं उद्ध्वस्त झाली. याची बातमी कार्यकर्त्यांना लागताच ताबडतोब त्यांनी मदत कार्यास सुरुवात केली.

हेही वाचाः नाटक शब्दावरुन ड्रामा, विधानसभेचं कामकाज तहकूब

पाळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंडळ प्रमुख संदीप तेंडुलकर, त्यांचे सहकारी मोहन जल्मी, गुरुनाथ दळवी, भरत वेळगेकर, सगुण पार्सेकर, आनंद राऊळ, मधुकर आसोलकर, संदीप राठोड, निखील प्रभू, ओंकार आगरवाडेकर, मुकेश मालवीय यांनी पंचवीस महिलांच्या सहाय्याने 800 हजार पोळ्या आणि त्यांना लागणारी भाजी तयार करून दोनशे लोकांपर्यंत 23 तारखेला दुपारी आणि रात्री भोजनाची व्यवस्था केली. तसंच 24 तारखेला सकाळी नाश्त्याला वडापाव देण्यात आली.

या आपत्तीची बातमी कळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक राजाभाऊ कोळपेकर कार्यवाह प्रदीप बिन्नर, सिद्धेश शेटकर, प्रकाश नाईक, लक्ष्मीकांत नाईक, सेन बांदोडकर, सागर रेवणकर, अभय प्रभू, श्याम, शेखर, सुदेश पैदरकर यांनी बैठक घेऊन त्वरित कामाची विभागणी केली आणि मदत कार्यास सुरुवात झाली. काही तरुणांनी ज्या घरांमध्ये पाणी घुसून चिखल झाला होता, तो चिखल काढण्याचं काम केलं आणि घर साफ केलं. स्वयंसेवकांच्या भोजनासाठी फोड्यांतून 200 फूड पॅकेट्स पाठवण्यात आली. संघ परिवारातील कार्यकर्ते रातोरात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता निघाले. पहाणी करता करता त्यांना पहाट झाली, जेव्हा ते घरी पोहोचले. लोकांची घरं पाण्यात बुडाली आहेत. भामई, तारीवाडा, चावडी, तीस्क, उसगाव, खांडेपार, धावकोण, कणकिरे, गांजे या गावातील अनेक घरातील सामान वाहून गेलं आहे. घरातील सर्व कपडे चिखलाने आणि पाण्याने खराब झाले आहेत. घरातील सर्व वस्तू ओल्या झाल्या आहेत. खाणार तर अन्न नाही. घालणार तर कपडे नाहीत. झोपणार तर अंथरुण नाही. अशी परिस्थिती या कुटुंबांची झाली होती आणि म्हणून पुढील मदतीची तयारी करण्याकरिता विचार विनिमय झाला.

हेही वाचाः चंद्रकांत बांदेकर यांचे खुनी मोकाट; पोलिस स्टेशनवर मोर्चा नेण्याचा शिवसेनेचा इशारा

24 जुलै ला सकाळी सामानाची जमवाजमव करण्यात आली. विश्व हिंदू परिषद सभागृहामध्ये लोकांनी मदत आणून सुपूर्द केली. काही सामान विकत आणलं आणि एका कुटुंबासाठी तीन दिवसासाठी लागणारे तांदूळ, डाळ, गूळ, पोहे, तेल, कांदे, बटाटे, तिखट, हळद, मीठ असं अत्यावश्यक सामान एका पिशवीत भरून अशा 300 पिशव्या तयार करण्यात आल्या आणि रातोरात प्रत्येकाच्या घरी पोचवण्यात आल्या. विश्व हिंदू परिषद सभागृहामध्ये सामान आणून पिशव्या तयार करण्याच्या कामासाठी प्रभात शिकेरकर, शिरीष आमशेकर, श्रीयुत बर्वे, मोहन आमशेकर, सुदेश पैदारकर, तसंच राष्ट्रसेविका समितीच्या पदाधिकारी विभावरी उमर्ये, राजश्री देसाई, सुनंदा आमशेकर, शिवांगी पैदरकर आणि अन्य सेवकांनी मदत केली. तयार केलेल्या 300 पिशव्या 24 तारखेला रातोरात मदत म्हणून घरोघरी पोचवण्यात आल्या. त्याचबरोबर झोपण्याकरिता अंथरूण-पांघरूण, टॉवेल आणि काही घरांमध्ये घालण्याकरता कपडे टी-शर्ट, पँट, साड्या, असं वितरित करण्यात आलं.

या मदत कार्यात डिचोली होंडा येथील स्वयंसेवकांनी सुद्धा मदत केली. तसंच सत्तरी तालुक्यात डॉक्टर अशोक आमशेकर, राजाराम घाडी, वैभव बापट, सुशांत हळदणकर, मंगेश माईणकर, गीता गाडगीळ, प्रकाष गाडगीळ, शिवाजी वझरेकर यांनी साठ घरांमध्ये अन्नधान्य, कपडे, भांडी हे नेऊन पोचवलं. गोशाळेलाही मदत केली. सत्तरीतील सावर्डे, कुडचे, वाळपई, कनकीरे, खडकी, सावर्शे, अडवई, गांजे आणि भामयी गावांमध्ये मदत पोचवण्यात आली. सांगायला अभिमान वाटतो, की सरकारी यंत्रणा आणि अन्य कोणतीही संघटना पोहोचण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते या मदतीसाठी पूरग्रस्त भागांमध्ये पोचले.

हेही वाचाः निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकालाः मायकल लोबो

याबद्दल स्थानिक लोक आश्चर्य आणि समाधान व्यक्त करत आहेत. या गावात तलाठी येऊन पाहणी करून गेले. परंतु त्यांनी बाहेरुनच घरं पाहिली. त्यामुळे त्यांना नेमकं घराचं नुकसान किती झालं आहे याची कल्पना येणं कठीण. त्या घरात संपूर्ण चिखल भरला होता. घर मालकही घरात गेले नव्हते. जेव्हा आमचे कार्यकर्ते चिखलातून घरात गेले, तेव्हा आतील भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेल्याचं त्यांनी पाहिलं. विश्व हिंदू परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्याकडे अशी मागणी आहे, की त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना पाठवून या घरांचा सर्व्हे करावा आणि जी घरं राहण्यास धोकादायक आहेत, ती संपूर्णतः नवीन बांधून द्यावीत.

मोहन अनंत आमशेकर, विश्व हिंदू परिषद गोमंतक
संपर्कः 9422058873.

हा व्हिडिओ पहाः Video | PARATEACHER`S | पॅरा टीचर्सची सतावणुक बंद करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!