‘आप’कडून संगीत चित्रफितीचे प्रकाशन

'चला गोव्यातील राजकारण साफ करूया' मोहिमेसाठी खास चित्रफीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आम आदमी पार्टी (आप) गोव्याने त्यांच्या ‘चला गोव्यातील राजकारण साफ करुया’ मोहिमेसाठी एक संगीत चित्रफीत प्रकाशित केली. काँग्रेसकडून भाजपमध्ये बेडकासारख्या उडी मारणार्‍या १० काँग्रेसच्या आमदारांची या चित्रफितीत चेष्टा केली आहे. ३ जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेला ५०,००० हून अधिक गोंयकारांचा पाठिंबा मिळाला आहे. या मोहिमेने ज्याने आपला विश्वासघात केला, त्यांना आता धडा शिकवण्यास गोंयकारांना प्रवृत्त केलं आहे.

हेही वाचाः म्हापसा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली; बुधवारपासून विक्रेत्यांना व्यवहार करण्याची मुभा

आमदारांनीच विश्वासघात केला

‘आप’ त्यांचा प्रचार पूर्ण राज्यभर करत आहे आणि अनेक गोंयकार यात सामील होत आहेत. कारण आपल्या गोव्यात ‘आप’ पक्षच चांगलं काम करू शकतो हे गोंयकार पाहत आहेत. त्यांना माहीत आहे की, एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या भाजप किंवा काँग्रेसवर त्यांचा विश्वास राहिला नाही. घरोघरी जाताना गोंयकारांनी ‘आप’ला सांगितलं आहे की, आता त्यांना असे नेते हवे आहेत, जे आपल्या मतदारांशी निष्ठावान राहतील. ज्या १० आमदारांकडून आशा केली, त्यांनी आपल्या मतदारांचा आणि हुद्द्याचा विश्वासघात केला असून, हे ‘विकासा’साठी केलं गेलं आहे असं निमित्त हे आमदार गोंयकारांना सांगत होते. पण विकास हा फक्त या आमदारांचाच झालाय, असा टोला ‘आप’ गोव्याच्या सहसंयोजक प्रतिमा कुतिन्हो यांनी लगावलाय.

हेही वाचाः एकनाथ खडसे ‘ईडी’ कार्यालयात दाखल ; चौकशी सुरू

आमदारांच्या खेळाला गोंयकार कंटाळलेत

आमदारांनी त्यांच्या भावनांसोबत केलेला खेळ पाहून गोंयकार कंटाळले आहेत. आज हे गाणं गोंयकारांचा जनादेश इकडून तिकडे बेडूक उड्या मारून तो चोरणाऱ्या आणि विकणाऱ्या आमदारांना उघडकीस आणत आहे, असं कुतिन्हो म्हणाल्या.

हेही वाचाः आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक हल्ला प्रकरणः गुन्हेगारांना लवकरच अटक करणार

गोंयकारांनी एकत्र येऊन राज्यातील राजकारण स्वच्छ करावं

आमची मोहीम या विश्वासघातांचा खरा चेहरा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने आहे. आम्ही प्रत्येक घरात पोहोचू आणि त्यांना हे पटवून देऊ, की या विश्वासघातक्यांनी फक्त आपली मतंच विकली नाहीत, तर गोव्याला गंभीर भ्रष्टाचाराकडे ढकललं आहे. जेव्हा आम्ही सहकारी भाऊ आणि बहिणी यांना मदत करण्यासाठी रेशन वितरीत करतो, तेव्हा त्यांना यापासून समस्या होती. पण ते गोंयकारांच्या मदतीसाठी स्वतःहून काही करत नाहीत. अशी वेळ आली आहे की, सर्व गोंयकारांनी एकत्र यावं आणि एकदा भाजप आणि काँग्रेसपासून गोव्याला मुक्ती देत गोव्यातील राजकारण स्वच्छ करावं, असं आवाहन कुतिन्होंनी गोंयकारांना केलंय.

हेही वाचाः आजपासून पुढील 4 दिवस राज्यात जोरदार सरींची शक्यता

त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सपासून ते शिजवून पॅक केलेले पदार्थ वितरण, डॉक्टरांच्या हेल्पलाईनला मिळत असलेल्या प्रतिसाद आणि आता ‘आप’ने साथीच्या रोगादरम्यान केलेलं रेशन वितरण, यावरून ‘आप’ सक्रियपणे कार्यरत असल्याचं दिसतं, असं त्या म्हणाल्या. ‘आप’ने भाजप सरकारने जे करायला हवं होतं, ते सर्व केलं आहे. काँग्रेसदेखील या काळात पूर्णतः गैरहजर होतं. हेच दाखवून देतं की त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि गोंयकारांच्या भावनांचं त्यांना काही पडलेलं नाही. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं कुतिन्हों म्हणाल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!