माकाझानमध्ये ‘आयआरबी’ची इमारत नकोचः रेजिनाल्ड

आमदारांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय - मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कुडतरी-माकाझाना येथील लेप्रसी इस्पितळाच्या जागेवर भारतीय राखीव पोलीस दलाचा (आयआरबी) कॅम्प उभारण्यास आमदारांनी गुरुवारी विधानसभा सभागृहात विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘संबंधित आमदारांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल’, असं आश्वासन सभागृहाला दिलं. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी शून्य काळात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे वरील मुद्दा उपस्थित केला होता. त्यातील काही जागा आयआरबी कॅम्पला देण्यास काही हरकत नाही, असं मत यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडलं.

हेही वाचाः अजब गजब ! टोलचे पैसे वाचवण्यासाठी असाही एक जुगाड

सरकारने फेरविचार करावा

माकाझाना येथे सरकारी जमीन आयआरबी कॅम्पाला देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे सरकारने त्यावर फेरविचार करावा, अशी विनंती आमदार आलेक्स यांनी केली होती. ही जागा लेप्रसी इस्पितळासाठी दिली होती. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात ती जागा आयआरबी कॅम्पसाठी दिली. याला स्थानिकांचा विरोध आहे. या जागेत सुसज्ज असं इस्पितळ व्हावं. स्वस्त दरात उपचार व्हावेत, या अटीवर ही जागा खासगी इस्पितळालाच द्यावी, असं मत आलेक्स यांनी मांडलं होतं. आमदार क्लाफासियो डायस यांनीही आलेक्स यांचा मुद्दा उचलून धरला. या मुद्यावर सभागृहात बरीच चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही

माकाझाना येथे ४ लाख चौरस मीटर जागा सरकारी मालकीची आहे. यातील एक लाख चौरस मीटर जागा आयआरबी कॅम्पसाठी दिली आहे. उत्तर गोव्यात आयआरबी कॅम्प आहे. तसाच तो दक्षिण गोव्यातही आवश्यक आहे. त्यासाठी जागा आवश्यक आहे. माकाझाना येथील जागेत बरीच अतिक्रमणे झाली आहेत. लवकरात लवकर या जागेचा वापर न झाल्यास आणखी अतिक्रमणे वाढतील. म्हणूनच एक लाख चौरस मीटर जागा आयआरबी कॅम्पसाठी व अन्य जागा इतर महत्त्वांच्या कामांसाठी वापरण्यास हरकत नाही. संबंधित आमदारांना विश्वासात घेऊन यावर निर्णय होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सभागृहाला दिली.

विविध सदस्यांची मते

माकाझाना येथील सरकारी जागेचा वापर व्हायलाच हवा, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांनी सभागृहात मांडली. १९८२ साली कंत्राटदार असताना मी तिथे श्रीरामाचे मंदिर बांधलं होतं. त्या जागेत सागवान, फणस आणि आंब्याची झाडे आहेत. त्या झाडांचे संवर्धन व्हायला हवं, अशी सूचना मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी यावेळी मांडली आहे. या ठिकाणी आयआयटी स्थापन करता आली असती. पण आयआयटीसाठी पुरेशी जागा तिथे नाही, असा मुद्दा आमदार क्लाफासियो डायस यांनी मांडला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!