जुलैपासून विविध पदांसाठी नोकर भरती : मुख्यमंत्री

जाहिराती प्रसिध्द झालेल्या सर्व जागा भरण्यात येतील

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : राज्यातील जी सरकारी पदे भरावयाची आहेत, त्याबाबत जाहिरातीही प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होऊ लागली असल्याने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. कदाचित जुलैपासून विविध पदांवरील नोकर भरतीसाठी परीक्षा घेणे सुरू होईल. जाहिराती काढण्यात आलेली सर्व पदे भरण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. दक्षिण गोवा भाजप जिल्हा कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नोकर भरतीबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, कोरोनाचा कालावधी असल्याने नोकर भरतीची प्रक्रिया पुढे नेण्यात आलेली नव्हती. आता बाधितांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कदाचित जुलै महिन्यापासून नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होईल व नोकर भरतीसाठी ज्या जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्या सर्व जागा भरण्यात येतील, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन वर्गाबाबत विचारणा केली असता शिक्षण संचालकांकडूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगतानाच अजूनही विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन वर्गाबाबतचा निर्णय घेण्यात येईल. याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शिक्षण संचालकांना देण्यात आलेले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात निवडणुका पुढील वर्षी होणार असून त्याची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आलेलीच आहे. पुढील सहा महिन्यात पक्षाकडून विविध कार्यक्रम केले जातील. आमदार, मंत्र्यांनी लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवणे गरजेचे आहे. कोविडच्या कालावधी हे झाले नसल्याने आता त्याचे नियोजन करण्यासाठी बैठक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा कार्यालयात दक्षिण गोव्यातील सर्व मंत्री, आमदार व भाजप मंडळाचे अध्यक्ष यांची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. मात्र, सदानंद शेट तानावडे यांनी कोविडमुळे सर्वजण एकत्र आले नव्हते व पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठीच ही बैठक असल्याचे सांगितले. तसेच जागतिक योग दिन, श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन, आणीबाणी जाहीर झालेला काळा दिन यासह २३ जून ते ६ जुलै या कालावधीत वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!