विक्रमासह पावसाने घेतला बळी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपर्यंत राज्यभर मुसळधार हजेरी लावत गेल्या सात वर्षांत मान्सून हंगामात पडलेल्या सर्वोच्च पावसाचा विक्रम नोंदविला. शिवाय वास्कोतील एका 63 वर्षांच्या महिलेचा बळीही घेतला. सोमवारी सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 या चोवीस तासांत 5.22 इंच पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड, तसेच रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटनाही घडल्या.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज राज्य हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस होता. तो मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. मुसळधार पावसामुळे वास्को येथील एका घरावर दरड कोसळली. दरडीखाली आल्याने त्या घरातील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या पथकाने मुरगाव पालिका कर्मचार्यांच्या मदतीने दरड हटवून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. नाले भरल्याने पाणी रस्त्यांवर येऊन अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. पेडणे, बार्देश, डिचोली, सत्तरी, वाळपई आदी भागांत वृक्षांची पडझड झाली. वृक्ष वीजवाहिन्यांवर पडल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. काही भागांत वृक्ष घरांवर कोसळल्याने हानी झाली. पाणी साचल्याने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. पावसाच्या तडाख्यातून जीवनावश्यक वस्तू, विजेवर चालणारे साहित्य वाचविण्यासाठी नागरिकांची दमछाक झाली.
दरम्यान, मंगळवारी सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी काही प्रमाणात कमी झाली. तसेच रस्त्यांवर साचलेले पाणीही ओसरले. त्यामुळे नागरिकांच्या जिवात जीव आला. पुढील तीन-चार दिवस मुसळधार ते मध्यम पाऊस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तवला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य प्रशासनाने दिल्या आहेत.
दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस
सोमवारी सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 या चोवीस तासांत 5.22 इंच पाऊस पडला. हा पाऊस यंदाच्या मान्सून हंगामातील दुसर्या क्रमांकाचा सर्वोच्च पाऊस ठरला. याआधी 17 जून रोजी 5.40 इंच पावसाची नोंद झाली होती.