भयंकर! तब्बल 9 दिवसांनी कोरोना चाचणीचा रिपोर्ट, फ्रंटलाईन कर्मचाऱ्याची कहाणी संताप आणणारी

वाळपईतील एका फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा अनुभव

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

वाळपई : लक्षणे आढळल्यास ताबडतोब चाचणी करून घ्या,असे सांगून 48 तासांत अहवाल मिळतो,असा दावा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करतात. त्यांच्या अखत्यारित खात्यात सेवा बजावणाऱ्या एका फ्रंटलाईन कर्मचाऱ्याचा अनुभव मात्र वेगळाच आहे. या कर्मचाऱ्याला नऊ दिवस झाले तरी अहवाल मिळाला नाही. नऊ दिवसांनी इस्पितळात जाऊन चौकशी केली तेव्हा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचं सांगण्यात आलं. या कर्मचाऱ्याने स्वतःची काळजी घेऊन वेळीच खबरदारी घेतली म्हणून वाचलो अन्यथा आपण हा संसर्ग इतरांनाही भेट दिला असता,अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीए.

नवव्या दिवशी रिपोर्ट, तोही पॉझिटिव्ह!

पोलिस खात्यात सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्याला काही प्रमाणात लक्षणे आढळून आल्याने त्याने लगेच चाचणी केली. अहवालाची प्रतिक्षा करत त्याने कोविडसंबंधी खबरदारी घेत औषधोपचारही सुरू केला. अहवाल आज येईल, उद्या येईल, असं म्हणून वाट पाहून शेवटी नवव्या दिवशी इस्पितळात जाऊन अहवाल तपासला, तर तो पॉझिटीव्ह असल्याचं सांगण्यात आलं. आता अहवाल येईल आणि नंतरच औषध सुरू करणार किंवा अहवाल येईपर्यंत आपणं बिनधास्त फिरलो असतो तर त्यातून कितीतरी जणांना हा संसर्ग दिला असता,अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

गलथान कारभार

आरोग्य खात्याच्या या गलथान कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीए. आपण काळजी घेतल्याने मी आज सुखरूप आहे, अन्यथा आरोग्य खात्याच्या अहवालाची वाट पाहिली असती तर आज आपण मृत्यूच्या वाटेवर असलो असतो, अशी संतप्त प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

तो म्हणाला की…

दि. ३ मे रोजी चाचणी केली होती व १२ मे ला अहवाल आला. याप्रकरणी वाळपई इस्पितळाविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतलाय. या विलंबाची नेमकी कारणे काय, त्याला कोण जबाबदार याची चौकशी होणे गरजेचे आहे. आपण पोलिस असून अहवालाची वाट पाहत रस्त्यावर सेवा बजावली असती तर, सहकारी तसेच लोकांना आपल्यापासून बाधा झाली असती. घरात वृद्ध आई वडील व लहान मुले आहेत. जर आपण अहवालाच्या भ्रमात राहिलो असतो तर एव्हाना त्यांनाही या महामारीच्या खाईत लोटले असते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!