फोंडा भाजपात बंडाळी, रवींसाठी धोक्याची लक्षणं?

फोंड्यात मंगळवारी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक; भाजपचे रितेश रवी नाईक आणि फोंडा भाजप मंडळ अध्यक्ष शांताराम कोलवेकर रिंगणात

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: फोंड्यात मागील काही दिवस छुप्या पद्धतीने सुरू असलेली भाजपमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. या नाराजीमागचं कारण ठरलंय फोंडा नगराध्यक्षपदासाठीची होणारी निवडणूक. मंगळवारी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. आणि या निवडणुकीत भाजपच्याच रितेश रवी नाईक यांना आव्हान दिलं आहे फोंडा भाजप मंडळ अध्यक्ष शांताराम कोलवेकरांनी. दोघांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

फोंडा पालिकेतील आकड्यांचा खेळ असा

फोंडा पालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या आहे 15. त्यात भाजपचे 8, मगोपचे 5 तर गोवा फॉरवर्डचे 2 नगरसेवक आहेत. मगोप आणि गोवा फॉरवर्डचे नगरसेवक एकत्र आले तर त्यांची संख्या होते 7. आता भाजपचे मंडळ अध्यक्ष आणि नगरसेवक शांताराम कोलवेकरांनी आपली उमेदवारी दाखल करून भाजपच्याच रितेश रवी नाईकांसमोर आव्हान उभं केलं आहे. आता जर रितेश नाईकांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपचे 6 एकसंध ठेवून विरोधातील 7 पैकी एका नगरसेवकाला फोडणे आवश्यक आहे. जर परिस्थिती उलट झाली आणि मगोप-गोवा फॉरवर्ड नगरसेवकांना भाजप गटातील एका जरी बंडखोर नगरसेवकाची साथ मिळाली, तर रितेश रवी नाईकांचा पराभव आणि शांताराम कोलवेकरांचा विजय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः तौक्ते पिडीतांच्या मदतीला धावले अंकित चौधरी

रवीच्या पारंपरिक विरोधकांना भाजप बंडखोरांची साथ

खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आमदार रवी नाईकांचे पुत्र रितेश नाईकांना नगराध्यक्षपदावर विराजमान होण्यापासून रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. मागील काही दिवसांपासून रवी नाईकांचे कट्टर विरोधक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक, मगोपचे नगरसेवक त्याचप्रमाणे भाजपमधील बंडोखोर नगरसेवकांनी एकत्र बैठकांचं सत्र आरंभल होतं. या सर्वांचा एकच मुख्य हेतू होता, तो म्हणजे रितेश रवी नाईकांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती हरवणं. या सर्व घडामोडींमध्ये मगोपचे सर्वेसर्वा आणि फोंड्याचे दुसरे पात्रांव यांच्यासह फोंड्याचे भावी मगो उमेदवार असलेल्या डॉक्टरांचाही महत्त्वाचा सहभाग असल्याचं समजतं.

हेही वाचाः ‘केंद्र सर्वतोपरी मदत करेल’, पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांकडे विचारपूस

भाजपच्या आदेशावर माजी नगराध्यक्ष दळवींचा राजीनामा

विश्वनाथ ऊर्फ अपुर्व दळवींनी काही दिवसांपूर्वींच नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. दळवी हे फोंड्याचे भाजपचे युवा निष्ठावान कार्यकर्ते आहेत. अलिखीत करारानुसार दळवींना 6 महिन्यांच्या काळासाठी नगराध्यक्ष पद दिलं होतं. मात्र दळवींनी 8 महिने नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. काही दिवसांपूर्वी दळवींना भाजपच्या वरिष्ठांनी बोलावून नेत नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. भाजपच्या आदेशाप्रमाणे दळवींना नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत रितेश रवी नाईकांसाठी मार्ग मोकळा केला होता.

हेही वाचाः भारतासाठी 6-18 महिने चिंतेचे; WHOच्या शास्त्रज्ञाचा इशारा

फोंड्याच्या पात्रवांची आता खरी राजकीय कसोटी

रितेश रवी नाईकांना नगराध्यक्षपदावर विराजमान करून पुढील विधानसभा निवडणूकीत फोंड्यातून भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांचा दावा करण्याची तयारी रवी नाईकांनी केली आहे. त्यासाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत रितेश नाईकांचा विजय हा कोणत्याही परिस्थिती होणं महत्त्वाचं आहे. तसं न झाल्यास रितेश नाईकांच्या पुढील राजकीय भविष्यवर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे रितेश नाईकांना नगराध्यक्षपदावर विराजमान करण्यासाठी फोंड्याचे पात्रांव काय राजकीय चाल खेळतात? एकत्र आलेल्या सर्व विरोधकांना धूळ चारण्यात पात्रांव यशस्वी होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून राहीलं आहे. मंगळवारी याचा फैसला होणार आहे.

हेही वाचाः तौक्तेने केलं वीज खात्याचं सर्वात जास्त नुकसान

बंड केलेल्या कोलवेकरांना भाजप थंड करणार?

‘गोवन वार्ता लाईव्ह’ने फोंड्यातील भाजपच्या अंतर्गत धुसफुसीबद्दल विचारण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं. मंगळवारी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीआधी भाजपचे बंडखोर शांताराम कोलवेकरांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडतील का, हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचाः मगोच्या कार्यालयात यावं, मदत केली जाईल

2022 मध्ये फोंड्यात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी

फोंडा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे रवी नाईक हे आमदार आहेत. गेली कित्येक वर्षं ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. रवींच्या राजकारणाची स्टाईल ही गोवाभर परिचीत आहे. एक हुशार, मुसद्देगिरी राजकारणी असलेल्या रवींनी आपल्या विरोधकांना अनेकदा चितपट केलं आहे. पण सध्याच्या परिस्थितीनुसार रवी नाईकांसमोर अनेक उमेदवारांचं आव्हान आहे. खुद्द भाजपमध्येच अनेकजण 2022 साली फोंड्यातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यात माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी त्याचप्रमाणे दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या नावांची चर्चा आहे. यात नव्याने भाजपवासी झालेले रितेश रवी नाईक यांचाही समावेश आहे. दुसऱ्याबाजुला मगोचे डॉ. केतन भाटीकरांना संभाव्य उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत आहे आणि भाटीकरांनी त्यादिशेने आपलं कामही सुरू केलं आहे. रितेश नाईकांच्या भाजप प्रवेशाने नाराज झालेल्या व्यंकटेश नाईकांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करून विधानसभेची तयारी केली आहे. रवींविरुद्ध त्यांच्याच काँग्रेस पक्षाने राजेश वेरेकरांचं आव्हान उभं केलंय. एकंदर पाहता एवढ्या संख्येने आपल्या विरुद्ध संभाव्य उमेदवारांची रांग लागलेली असताना रवी नाईक ही कोंडी कशी फोडतात आणि आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवतात याकडे संपूर्ण गोव्याचं लक्ष लागून राहीलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!