‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्यांचा मसाला’, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

महामंडळामुळे आगामी काळात सरकारला आणखी भुर्दंड सोसावा लागणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील कदंब परिवहन महामंडळातर्फे सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बसेसची अवस्था सध्या ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्यांचा मसाला’ अशी झाली आहे. या बसेस ईव्हीआयवाय ट्रान्सलाट या कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. सध्या प्रत्येक बसमधून प्रतिदिन सरासरी १० हजार रुपये उत्पन्न मिळते. मात्र बसेसचे भाडे प्रतिदिन सरासरी १४ हजार रुपयांप्रमाणे द्यावे लागत आहे. म्हणजे सध्या प्रत्येक बसमागे महामंडळ ४ हजार रुपये स्वतःच्या तिजोरीतून देते आहे.
हेही वाचाःशिवोलीतील डॉम्निक डिसोझाला अटक, ‘हे’ आहे कारण…

सरकारला आणखी भुर्दंड सोसावा लागणार

जुलै २०२१ मध्ये या बसेस राज्यात आणण्यात आल्या होत्या. एप्रिल २०२२ पर्यंत या बसेसचे भाडे प्रती किलोमीटर ७५.८७ रुपये याप्रमाणे ५ कोटी ९१ लाख ८० हजार ३८७. २७ रुपये इतके देण्यात आले आहेत. हे भाडे महामंडळाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२२ या काळात महामंडळाचे उत्पन्न ५ कोटी १८ लाख ९७ हजार ९४२.८६ इतके आहे. म्हणजे एकूण ७२ लाख ८२ हजार ४४४.४१ रुपये महामंडळाने स्वतःच्या पदरचे दिले आहेत. यावरून इलेक्टिक वाहने महामंडळाला चांगलीच महाग पडताना दिसत आहेत. यामुळे आधीच तोट्यात असणाऱ्या या महामंडळामुळे आगामी काळात सरकारला आणखी भुर्दंड सोसावा लागणार आहे.
हेही वाचा:ओबीसींचे होणार नव्याने सर्वेक्षण, ‘हे’ आहे कारण…

हैदराबादस्थित ईव्हीआयवाय ट्रान्सलाट या कंपनीच्या या गाड्यांची देखभाल कंपनीच करत आहे. बसवर असणारे चालक कंपनीचे असतात. महामंडळाचा केवळ वाहक बसमध्ये असतो. नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास होऊ नये, म्हणून पदरमोड करून मंडळ या गाड्यांचे भाडे देत आहे.

उल्हास तुयेकर, अध्यक्ष, कदंब परिवहन महामंडळ

कदंब महामंडळ सध्या तोट्यात सुरू आहे. अशातच स्वतःच्या खिशातील लाखो रुपये घालून महामंडळाचे दिवाळे निघत आहेत. बाहेरच्या गाड्यांना एवढे पैसे देण्यापेक्षा राज्यातील खाजगी बसेस त्यांनी चालवायला घ्याव्यात.
सुदीप ताम्हणकर, अध्यक्ष, अखिल गोवा खाजगी बसमालक संघटना

हेही वाचाःचिंबल येथे मालवाहू ट्रकच्या धडकेत वृद्ध ठार…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!