‘सर्व 40 जागा लढवणार! मनोज परब यांचा विधानसभा लढवण्याचा निर्धार

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : रिव्होल्यूशनरी गोवन्स संघटना आगामी विधानसभा निवडणूकीत सर्व ४० जागा लढवणार आहे. आपल्याला थिवी, साखळी आणि वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली जातेय. अद्याप निर्णय घेतलेला नाही. आगामी काळात राज्यात आरजीची महालाट येणार आहे आणि ती कुणीच रोखू शकणार नाही. प्रुडंट मिडीयाचे संपादक प्रमोद आचार्य यांनी रिव्होल्यूशनरी गोवन्सचे निमंत्रक मनोज परब यांची हेड ऑन मध्ये घेतलेली मुलाखत बरीच गाजतेय.
कुणाचीही कॉपी करणार नाही!
रिव्होल्यूशनरी गोवन्स संघटना ही ओरीजीनल संघटना असून कुणाचीही कॉपी संघटना नाही. आम्ही लोकशाही मानणारे आणि शांतताप्रिय क्रांतीकारी आहोत. हिंसेवर आमचा विश्वास नाही. आम्ही गोंयकारांना जागे करीत आहोत आणि गोंयकार जागा होतो आहे. केवळ व्होटबँक पॉलिटीक्स करून सर्वंच राजकीय पक्ष गोव्याची लुटमार करीत आहेत,असा आरोप मनोज परब यांनी केला. इथे फक्त गोंयकारांची सत्ता असायला हवी. आमचा कुणालाही विरोध नाही परंतु परप्रांतातून इथे येऊन आमच्यावर कुणी सत्ता गाजवू पाहत असेल तर ते आरजी सहन करून घेणार नाही.
खरा गोंयकार आरजीसोबत!
खरा गोंयकार हा पूर्णतः आरजीसोबत आहे. आरजी मतविभाजन करणार नाही तर इतर सर्व राजकीय पक्ष मतविभाजन करणार आहेत. आगामी निवडणूकीत लोक फक्त आरजीलाच मतदान करणार आहेत. आमच्यामागे गोंव्यासंबंधी आस्था आणि प्रेम असलेल्यांची मोठी ताकद आहे. ते आम्हाला सर्व तऱ्हेची मदत करतात. लवकरच गोव्यासाठीचा व्हीजन डॉक्यूमेंट जाहीर केला जाईल. गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी निवडणूकीत उतरणे गरजेचे आहे आणि त्यात आरजी मागे हटणार नाही. आत्तापर्यंत माध्यमांनीही आरजीकडे दुर्लक्ष केले परंतु भविष्यात इच्छा असूनही कुणीही आरजीकडे दुर्लक्ष करू शकणार नाही, असे मनोज परब म्हणाले.