दसरा कसा होणार हासरा? आपलं घर सजवणाऱ्या फुलं विक्रेत्यांचा दसरा कोमेजलेलाच!

फुलं महागल्यानं अनेकांनी नाकं मुरडली. पण...

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात सगळीकडे उत्साहात दसरा साजरा होत आहे. पण या सगळ्यात एक वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे. हा वर्ग आहे फुल विक्रेत्यांचा. बाजारात फुल विक्रेत्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. दुसऱ्याच्या निमित्तानं दोन पैसे मिळून संसाराला हातभार लागेल, अशी अपेक्षा होती. पण झालं उलटच. फुल विक्रेत्यांचा म्हणावा तसा धंदा होऊ शकला. वास्कोमध्ये स्थानिक फुल विक्रेत्यांना आडमुठेपणा करत फुलांची किंमत दुप्पट केल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानीमध्ये या सर्व फुल विक्रेत्यांचं काय नुकसान झालं असेल, याची कल्पना कुणी करणार आहे का? लॉकडाऊनचा फटका सगळ्यांनाच बसला. अशात फुलांच्या किंमतीही महागल्या. अपेक्षेप्रमाणेच फुलांच्या किंमती दुप्पट झाल्यात. ग्राहक त्यामुळे नाराज झाले. पण दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा असल्यांना फुल विक्रेत्यांच्या हाती मात्र निराशा आली.

बार्गेनिंग करणं योग्य की अयोग्य?

दसऱ्याला झेंडूच्या फुलांचं महत्त्व खूप. ही फुलं 180 रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत विकली जात होती. बाहेरुन फूल विक्रेते येऊन स्थानिक विक्रेत्यांच्या बाजार उठवत असल्याचं याआधीही अनेकदा निदर्शनास आलेलं आहे. अशातच यावेळी राज्यात झेंडूचं विक्रमी उत्पादन घेतलं गेलं. मात्र त्याचा म्हणावा तसा आर्थिक लाभ उत्पादकांना तर सोडाच पण विक्रेत्यांनाही होऊ शकला नाही. इतरवेळी फूलखरेदी करताना भाव केला जातो. मात्र यंदा भाव करणाऱ्यांना विक्रेत्यांनी भावच दिला नाही. जो काळ पैसे कमावण्याचा, त्या काळातही पदरमोड होत असले, तर एखाद्या व्यावसायिकानं धंदाच का करावा? यंदा फिक्स रेटवर फुलांची विक्री करण्याचं विक्रेत्यांनी ठरवलं. त्याची झळ ग्राहकांना बसली.

एकीकडे धंदा नसल्यानं संसार कोमेजू लागलाय. त्यात मेहनत करुन झेंडू किंवा इतर फुलांची विक्री करणाऱ्यांनी यंदा आक्रमक पवित्रा घेतला. ही दरवाढ या महामारीच्या काळाचा परिणाम. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या विक्रेत्यांनी, उत्पादकांनी अशावेळी काय करावं? आपला संसार कोमेजू द्यावा? की दोन पैसे मिळवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी? गेले 6-7 महिने जेव्हा कोणताही धंदा चालत नव्हता, त्याचा फटका या वर्गालाही सर्वाधिक बसल्याचं विसरुन कसं चालेल?

सण मिळून साजरे करायचे

दसऱ्याला शस्त्रपूजन केलं जातं. या विक्रेत्यांचं शस्त्र म्हणजे त्यांची फुलं. ही फुलं शस्त्र बनून त्यांना लढण्याची ताकद देत आहे. अशात त्याचा सुगंध घ्यायचा सोडून ग्राहकांनी मात्र दरवाढीच्या बोंबा मारल्यात. सण मिळून साजरे करण्यासाठी असतात. कोणत्या ना कोणत्या कारणानं आपण एखाद्याच्या आनंदाचं कारण होऊ शकत असू, तर त्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याची गरज आहे. फुलांची दरवाढ झाली, हे नाकारता येणार नाहीच. पण दरवाढीवर ठाम असणाऱ्या विक्रेत्यांच्या भूमिकेवर आपण शंका घेणार असून, तर सगळ्यांचा दसरा हासरा होणार नाही.

खरा दसरा, खरा विजयोत्सव

दसऱ्याला सोनं घ्यायची पद्धत. दसऱ्याला फुलं दरवर्षीच महाग होतात. यंदा थोडी आणखीनंच महाग झाली. महामारीत हे होणारच होतं. सोनं महाग झाल्यानंतर आरडाओरडा न करणारी मंडळी फुलं महाग झाली, की लगेच नाकं मुरडतात. दोन पैसे जास्त देऊन फुल खरेदी केल्यानं एखाद्याचा कोमेजणारा संसार पुन्हा फुलणार असेल, तर त्या दोन पैशांची किंमत सोन्यापेक्षा बहुमोल आहे. आपल्या सगळ्यांना याची जाणीव होणं, ही खरा दसरा. हाच खरा विजयोत्सव. सगळ्यांनी मिळून सगळ्यांना जगवणं, हाच खरा विजयोत्सव. तेच खरं सीमोल्लंघन.

हेही वाचा –

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का वाटली जातात?

पेडणे तालुक्यात फुलतेय सेंद्रिय पद्धतीनं झेंडूची शेती

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!