रतन टाटांनी कुत्र्याचं नाव ठेवलं ‘गोवा’, व्यक्त होण्याआधी वाचा यामागचं कारण…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपल्या कुत्र्याचं नाव ‘गोवा’ असं ठेवलंय. यावरून गोमंतकीयांना नक्कीच संताप येउ शकेल. पण हे नाव ठेवण्यामागचं कारण रतन टाटा यांनीच स्पष्ट केलंय.
रतन टाटा हे उद्योगपती असण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. कोरोना काळात बहुतेक कंपन्यांनी कामगार कपात केलेली असताना टाटा ग्रुपने मात्र कपात करणार नसल्याचं जाहीर करून कामगारांना मोठा दिलासा दिला होता. टाटा हे श्वानप्रेमासाठी ओळखले जातात. काही महिन्यांपासून ते सोशल नेटवर्किंगवरही सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवरुन वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्याबद्दलची माहिती आणि पूर्वी कधीही समोर न आलेले त्यांच्या आठवणींमधील फोटो पोस्ट करत असतात. रतन टाटा हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल सोशल नेटवर्किंगवरुन चाहत्यांना रंजक माहिती देत असतात. असाच एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला. ज्याबाबत मोठं कुतूहल वाटणं साहजिक आहे.
इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला फोटो…
रतन टाटा हे मुंबईमधील बॉम्बे हाऊसमध्ये राहतात. अनेक प्राणीमित्र संघटनांना ते मदत करत असतात. त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्येही दोन जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबरच काही दत्तक घेतलेले कुत्रेही आहेत. याच कुत्र्यांबरोबरचा एक फोटो रतन टाटांनी दिवाळीनिमित्त शेअर केला. बॉम्बे हाऊसमधील कुत्र्यांबरोबरचे काही खास क्षण दिवाळीदरम्यानचे आहेत. “यापैकी ‘गोवा’ हा कुत्रा खूप खास आहे. कारण तो मला ऑफिसमध्येही सोबत करतो” असं रतन टाटांनी म्हटलं आहे. अर्थात, गोमंतकीयांना याबाबत संताप येणं साहजिक आहे. कारण कोणतीही व्यक्ती कितीही मोठी असली, तरी एखाद्या राज्याचं नाव आपल्या कुत्र्याला कसं काय ठेवू शकते, असा विचार मनात येउन टाटांविषयी राग येणं सयुक्तिक आहे.
गोव्याहून आला म्हणून ‘गोवा’!
टाटांच्या इन्स्टाग्रामवरील या पोस्टवर एका चाहत्याने ‘तुमच्या कुत्र्याचं नाव गोवा आहे?, या नावामागे काही विशेष कारण किंवा किस्सा आहे का?,’ असा प्रश्न विचारला. सामान्यपणे सेलिब्रिटी आपल्या फॉलोअर्सना रिप्लाय देत नाहीत. मात्र रतन टाटांनी कुत्र्याचं नाव गोवा ठेवण्यामागील गोष्ट या चाहत्याच्या कमेंटला रिप्लाय करुन सांगितली. ‘माझा एक सहकारी गोव्याहून त्याच्या कारने मुंबईला येत असताना रस्त्यावरील एक कुत्र्याचं छोटं पिल्लू त्याच्या गाडीत चढलं आणि ते थेट बॉम्बे हाऊसपर्यंत आलं. त्यामुळेच त्याचं नाव गोवा असं ठेवलं आहे,’ अशी कमेंट टाटांनी केली. टाटांच्या या पोस्टला 1 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.