अल्पवयीन मुलींवर बलात्कारप्रकरणी चोघांना पोलीस कोठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : बाणावली समुद्र किनाऱ्यावर झालेल्या अल्पवयीन मुलींच्या बलात्कारप्रकरणी संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्वांची आता कसून चौकशी सुरु आहे.
बाणावली समुद्र किनाऱ्यावर रविवारी पहाटेच्या सुमारास चौघांच्या टोळक्याने पोलीस असल्याचे भासवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर कोलवा पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केलीये. सोमवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पीडित मुलींना मोबाईलवर आलेल्या संदेशावरून पोलिसांनी संशयितांना अटक केली होती.
कोण आहेत नराधम?

बाणावली येथील ‘हॉटेल ताज’जवळ बलात्काराची ही घटना घडली. मडगाव हाऊसिंग बोर्ड इथं राहणारा २१ वर्षीय असिफ हटेली, दवर्लीतील झरीवाडा इथं राहणारा ३३ वर्षीय राजेश माने ३१ वर्षीय गजानन चिंचणकर आणि १९ वर्षीय नितीन यब्बल अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
घटनाक्रम
दहाजणांचा एक गट वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने शनिवारी रात्री बाणावली समुद्रकिनाऱ्यावर आला होता. रात्री उशिरा तीन मुलांसह दोन अल्पवयीन मुली किनाऱ्यावरच थांबल्या. तर इतर पाचजण वास्तव्यास असलेल्या ठिकाणी गेले. रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चारजण समुद्रकिनाऱ्यावर आले. मुलींसोबत असलेल्या मुलांना त्यांनी पोलीस असल्याचे सांगत मारहाण केली. नंतर त्या दोन अल्पवयीन मुलींना घेऊन संशयित निर्जनस्थळी गेले आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं.
या घटनेनंतर संशयितांनी पीडित मुलींना मोबाईलवर एसएमएस पाठवून ४० हजार रुपयांची मागणी केली. या प्रकाराला घाबरून दोन्ही पीडित मुलींनी कोलवा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश मडकईकर हे कोलवा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी मुलींच्या मोबाइलवर आलेल्या संदेशाद्वारे चारही संशयितांना ताब्यात घेतले व चौकशीअंती अटक केली. त्यानंतर त्यांना मडगाव पोलीस मुख्यालयात आणण्यात आले होते.
हेही वाचा : नारायण नाईक हल्ला प्रकरणः हल्लेखोर आरोपी इस्माईल शेखला अटक
संवेदनशील प्रकरण की, राजकीय दबाव?
बाणावली येथील बलात्कार प्रकरणी दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही माहिती देण्यास पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी नकार दिलाय. मात्र, या प्रकरणातील संशयितांपैकी एक व्यक्ती एका मंत्र्याचा व एका आमदाराचा खास असल्याने पोलिसांकडून यावर मौन बाळगले जात आहे, अशी चर्चा पोलीस स्थानकाबाहेर सुरू होती.