राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी रमणमूर्ती

१८ मार्चला आदेश जारी होण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी निवृत्त आयएएस अधिकारी डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांचं नाव निश्चित झालं आहे. गुरुवारी त्यासंदर्भातील आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः ‘त्या’ महिलेला अखेर मिळाला जीएमसीत बेड

डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांच्या नावाला पसंती

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायदा सचिव चोखाराम गर्ग यांनी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा ताबा रविवारी सोडला. त्यानंतर या पदासाठी आयएएस अधिकारी तथा राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, माजी वित्त सचिव दौलत हवालदार, अरुण देसाई व डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती या चौघांच्या नावांची चर्चा सुरू होती. बुधवारीही याच नावांची चर्चा कायम राहिली. पण संध्याकाळी सरकारने रमणमूर्ती यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सरकारातील सूत्रांकडून मिळालीये. डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती हे आयएएस कॅडरमध्ये बढती मिळण्यापूर्वी राज्य नागरी सेवेत होते. समाजकल्याण, सहकार तसंच नागरी विमान वाहतूक खात्यांच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.

हेही वाचाः कोर्ट अपडेट : अन्वर शेख हल्लाप्रकरणी तानावडेला सशर्त जामीन

गुरुवारी आदेश जारी होण्याची शक्यता

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही बुधवारी पत्रकारांशी बोलताना राज्य निवडणूक आयुक्तांची निवड होऊन गुरुवारी त्यासंदर्भातील आदेश जारी होईल, असं स्पष्ट केलं होतं. सरकारने याआधी नारायण नावती यांची आयुक्तपदी नेमणूक करण्याचं निश्चित केलं होतं. पण राज्य नागरी सेवेत त्यांनी २० वर्षं काम केलेलं नसल्यामुळे सरकारने त्यांचं नाव वगळलं होतं. सहा पालिकांसाठी येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यामुळे सरकार आयुक्तांची नेमणूक कधी करणार, असा प्रश्न विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर या पदासाठी रमणमूर्ती यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!