शिक्षक ते पर्यावरणवादी – एका अवलियाची गोष्ट

राजेंद्र केरकर | प्रतिनिधी
पणजीः दरवर्षी जेव्हा ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तेव्हा माझ्यातल्या शिक्षकाला मंतरलेल्या शिक्षकी पेशातल्या दिवसांची प्रकर्षाने आठवण होते. आज सेवानिवृत्त होऊन कधीच नऊ वर्षांचा कालखंड उलटलेला असला, तरी माझा प्रत्येक दिवस मला मी शिक्षक असल्याची जाणीव करून देत असतो. १४-१५ वर्षांच्या नोकरीचा कालखंड शिल्लक असताना मी पूर्णपणे पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि विद्यार्थी, युवक यांच्याबरोबर समाजातल्या सर्व थरातल्या लोकांत पर्यावरण विषयाची जागृती व्हावी म्हणून स्वेच्छेने या कार्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. अकरावी तसेच बारावी इयत्तेत असलेल्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा सेवानिवृत्त होणार असल्याचे वर्गात सांगितले तेव्हा त्यांनी माझ्या निर्णयापासून मला रोखण्यासाठी भावनिकरीत्या प्रयत्न केले. गेल्या १७ वर्षांत अध्यापक म्हणून कार्यरत असताना मी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार, व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण शिक्षणाचा वारसा दिला होता त्या विषयीची कृतज्ञता दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाच्या पर्वकाळात मी बऱ्याचदा अनुभवली आहे.
चळवळीकडे होता ओढा
बारावी परीक्षेत गोवा शालान्त मंडळाच्या यादीत मी राज्यात आठवा आणि डिचोली सत्तरी केंद्रात प्रथम आल्याकारणाने त्या वेळचे माझे हायर सेकंडरीतले अर्थशास्त्राचे शिक्षक अजित मोये यांनी पत्रकार म्हणून मुलाखत घेतली होती तेव्हा मी त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, भारतीय प्रशासकीय सेवेची पूर्वतयारी करत असताना माझा ओढा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय चळवळीकडे निर्माण झाला. माझ्या गावातच या विविध क्षेत्रांत कार्य करण्याच्या हेतूने मी संस्था स्थापन केल्या आणि उच्चपदस्थ नोकरीऐवजी आयुष्यभर चळवळीशी जोडून घेतले. सुभाषचंद्र बोस, शिवाजी महाराज यांचे आदर्श माझ्यासमोर गोवा लिबरेशन आर्मीचे सक्रिय कार्यकर्ते असणाऱ्या माझ्या वडिलांनी आणि मामाने ठेवले होते.
खेडेगावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा
हायर सेकंडरीत मी शिक्षकी पेशा पत्करला तेथे ग्रामीण भागातून आणि यथातथा आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांचा अधिकाधिक भरणा असल्या कारणाने त्यांच्या पाल्यांना इंग्रजीतून शिकवला जाणारा इतिहास आणि समाजशास्त्र हृदयापर्यंत पोहोचवण्यास केवळ शालेय अभ्यासक्रम नव्हे तर त्यांच्याशी निगडित परिसरातल्या घटकांची सांगड घालण्याची मी पूर्वतयारी केल्याने त्याचा अध्यापन करताना फायदा झाला. मद्यपान, धूम्रपान, जुगार-मटका यासारख्या व्यसनांच्या खाईतून विद्यार्थ्यांना मुक्त करून त्यांना पदभ्रमण, गिर्यारोहण, किल्लेदर्शन, निसर्ग भ्रमंती, पुराणवस्तू संग्रहालय, ग्रंथालय यांना भेटी देणे यासारखे उपक्रम राबवून त्यांच्यात ज्ञानार्जनाची गोडी निर्माण केली. आपल्या परिसरात शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा मिरवणाऱ्या या नैसर्गिक गुंफा आहेत, जीर्ण अवस्थेतील किल्ले, मंदिरे, चर्चेस तसेच अन्य वास्तू उभ्या आहेत. त्यांचे दर्शन घडवून त्यांच्या इतिहास संस्कृतीचा वेध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यामुळे खेडेगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरातत्त्व, पुराभिलेख, अध्ययन, वकिली, संशोधन आदी विषयासंदर्भात आवड निर्माण झाली.
स्नेहबंध अजूनही अतूट
इंग्रजी भाषेतील पी. शेषाद्री यांची गुरुदक्षिणा या संकल्पनेवरची एक सुंदर कविता वाचनात आली. या कवितेतला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून गुरुदक्षिणा म्हणून वाटेत भेट झाल्यावर हसऱ्या चेहऱ्याची केवळ अपेक्षा ठेवतात. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य ही त्यांना आपल्या कार्यासाठीची कृतज्ञता, आदर वाटतो. आज हायर सेकंडरीत केवळ दोन वर्षांसाठी जे विद्यार्थी माझ्या संपर्कात आले होते, त्यांपैकी काही जणांचे स्नेहबंध अजूनही अतूट राहिले आहेत. मी जे कार्य स्वीकारले आहे, जी मूल्ये हृदयी धारण केली आहेत त्या मोहिमेत आपला खारीचा वाटा अशा सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेले माझे काही विद्यार्थी शक्तिस्थाने झालेली आहेत. आज जेव्हा जगातली बरीच राष्ट्रे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर अडखळत मार्गक्रमण करत आहेत, तेव्हा आगामी आणि वर्तमान काळात आम्ही शिक्षक त्यांच्यासाठी ऊर्जा केंद्रे होऊ शकतो. केवळ शालेय अभ्यासक्रमापुरता संबंध न ठेवता कालानुरूप गरज असलेल्या जीवनमूल्यांना रुजवण्यात शिक्षक या नात्याने आमचे योगदान त्यांना दिशादर्शक ठरणार आहे.