कुठ्ठाळीत पावसाचं पाणी शिरलं घरात

नागरिकांचा संताप; पाण्याचा निचरा होण्यासाठी वाटच नाही

दयानंद राणे | प्रतिनिधी

वास्कोः कुठ्ठाळी येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात न आल्याने पावसाचे पाणी दुतर्फा असलेल्या घरांमध्ये गेलं. यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी दखल घेतली. त्यानंतर तेथे जेसीबी आणून पाण्याला योग्य वाट करून देण्यात आली. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊस्कर यांनी लक्ष घालावं. तसंच झुआरी पुलाचं काम करणाऱ्या डीबीएल कंपनीला तेथे योग्य उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. 

हेही वाचाः बार्देशमध्ये सतंतधार पावसामुळे पडझड

नागरिकांनी व्यक्त केला संताप

बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पावसाचं पाणी उतरणीवरून वाहत रस्त्याकडेला असलेल्या काही घरांमध्ये शिरू लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यरित्या होण्यासाठी योग्य ती खबरदारी न घेतल्याने सदर घटना घडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. काहीजणांनी महामार्गावरील रहदारी बंद करण्याचा विचार चालविला होता.

हेही वाचाः नोकरभरती बंदीचा मी खलनायक नाही!

आमदार साल्ढाणांनी केली परिस्थितीची पहाणी

यासंबंधी आमदार साल्ढाणा यांना माहिती मिळताच त्या दुपारी साडेतीन वाजता घटनास्थळी आल्या. त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. तेथील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी वाट फुटेल तसं वाहू लागलं होतं. पाण्याला योग्य वाट करून देण्यासाठी तिथे जेसीबी आणण्यात आला. पाण्याचा निचरा व्हावा यासाठी योग्य वाट करून देण्यात आल्यानं वस्तीकडे जाणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला.

हेही वाचाः चिखलात उभं करून बसस्थानक प्रमुखांना दिलं निवेदन !

संबंधितांना खबरदारी घेण्याचा दिला इशारा

साल्ढाणा यांनी सदर प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. अशा प्रकारच्या घटना गेली चार वर्षं पावसाळ्यात घडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्यरित्या होणार की नाही यासंबंधी संबंधितांनी खबरदारी घेण्याची गरज होती. परंतु योग्य ती खबरदारी घेण्यात आली नसल्याचं दिसून आलं. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालण्याची गरज आहे. याप्रकरणी आपण डीबीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे बोलले आहे. तिथे योग्य ती उपाययोजना करण्यात आली पाहिजे, असं साल्ढाणा म्हणाल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!