छत्री हवीच! आजपासून पुढचे ३ दिवस गोव्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा

पुढचे ५ दिवस मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : रविवारी राज्यातली वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे काजू आणि आंबा बागायतदार धास्तावले आहे. दरम्यान आता आजपासून पुढचे तीन पुन्हा एकदा राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजाप्रमाणे, १२ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत पुन्हा पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे.

वादळी पावसाच्या शक्यतेमुळे मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ५ दिवस मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारी करण्यासाठी जाऊ नये, असं आवाहन केलं जात आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्यानं पुन्हा एकदा राज्यातील बागायतदार हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा – RBI: आता RTGS, NEFT साठी बँकांची गरज नाही?

रविवारीही अवकाळीच्या जोरदार सरी

साधारण पाच दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज रविवारी खरा ठरला होता. ऐन उन्हाळाचा हंगाम सुरू असतानाच रविवारी दुपारी डिचोली शहरात तब्बल अर्धा तास अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळला होता. शिवाय साखळी, कुडचडे, केपे आणि सत्तरी तालुक्यांतही दमदार पाऊस बरसला. यामुळे रविवारी दुपारपर्यंत वाढलेला उष्णतेचा पारा सायंकाळच्या सुमारास अचानक खाली आला.

पाच दिवसांपूर्वीच पणजी हवामान खात्याने, ८ एप्रिलपासून पुढील दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला होता. दोन दिवसांपासून डिचोली भागातील वातावरण ढगाळ होते. शिवाय उष्णतेचा पाराही चढला होता. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने अंगातून घामाच्या धारा लागत होत्या.

हेही वाचा – Video | कणकिरे-गुळेलीला वादळाचा तडाखा, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्यं

दरम्यान, रविवारी काळपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते. दुपारच्या सुमारास शहरात पावसाने थैमान घातले. तब्बल २५ मिनिटे मुसळधार पाऊस कोसळला. साखळी, कुडचडे, केपे, सत्तरीही बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे डिचोलीत कमालीचा गारवा निर्माण झाला. या पावसामुळे कुठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!