ऐन फेब्रुवारीतही पावसाच्या सरी बरसणार?

थंडीचा जोर कमी होणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तीन दिवस कडाक्याची थंडी सोसल्यानंतर आता थंडीचा जोर थोडा कमी होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून मिळाले आहेत. किमात तापमान ३ अंश सेल्सियसने वाढणार असल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलंय. उत्तर केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत वार्‍याच्या दिशेत अचानक बदल झाला आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार दिवसांत गोव्यात हलक्या सरीही कोसळण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आलीये.

वाऱ्याच्या दिशेत बदल

उत्तर केरळ ते मध्य महाराष्ट्र या भागाला जोडणारा एक जमिनीवरील ट्रफ निर्माण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेत बदल होणार आहे. ओलावा घेऊन येणारा वारा हा पावसाचे ढग निर्माण करण्याची शक्यता आहे. परिणामी १७ फेब्रुवारीला पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय.

मंगळवारपासून तापमानात बदल होणार

शुक्रवारी १२ फेब्रुवारीपासून किमान तापमान हे २० अंश सेल्सियसपेक्षा खाली उतरू लागलं होतं. रविवारपर्यंत ते खालीच राहिलं. १९.७ अंश सेल्सियसच्या आसपास तापमान असल्याने तिन्ही दिवस कडाक्याच्या थंडीचे ठरले. मंगळवारपासून तापमानात बदल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

सर्वात थंड दिवस

१२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हे या महिन्यातील सर्वात थंड दिवस राहिलेत. या तीन दिवसात किमान तापमान हे २० अंश सेल्सियसपेक्षा खाली गेलं होतं. तसंच संपूर्ण जानावेरी महिना हा उबदार राहिला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!