अबब! हा आणि कसला कॅसिनो

मडगावात अवैध कसिनोवर कारवाई; 11 जण अटकेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः मडगाव गांधी मार्केटमध्ये लोटलीकर इमारत परिसरात अवैधरीत्या कॅसिनो सुरू होता. शहरात गस्त घालताना पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ कॅसिनोवर कारवाई करण्याचे आदेश मडगाव पोलिसांना दिले.

3 लाख 65 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त

या धडक कारवाईत पोलिसांनी अवैधरित्या कॅसिनो खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या अशा 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तसंच या छाप्यात 80 हजार 510 रोख रुपये, प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीचे लेनोवा कंपनीचे 11 कॉम्प्युटर, एक इंटरनेट मोडेम, एक राऊटर, दोन वायफाय डोंगल अशा दहा हजार रुपयांचे साहित्य मिळून एकूण 3 लाख 65 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

गांधी मार्केटमधील लोटलीकर इमारतींच्या परिसरात कारवाई

राज्यात सध्या कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग हे मडगाव शहरातील पोलीस बंदोबस्त कर्फ्यूचं पालन कशाप्रकारे होत आहे, याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी निघाले होते. मडगाव पालिकेकडून गांधी मार्केटकडे जात असताना गांधी मार्केटमधील एका बोळातून काही व्यक्ती बाहेर पडताना दिसल्या, पोलिसांची गाडी पाहताच या सर्व व्यक्तींनी पळ काढला. यामुळे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांचा संशय बळावला आणि त्यांनी गाडीतून खाली उतरत पाहणी केली. त्यावेळी गांधी मार्केटमधील कुराडे सोडा फॅक्टरीनजीक लोटलीकर इमारतींच्या परिसरातील खोलीतून या व्यक्ती बाहेर आल्याचं दिसून आलं. त्यांनी त्या खोलीचा दरवाजा ढकलून पाहणी केली असता त्या खोलीत अवैधरीत्या कॉम्प्युटरवर कॅसिनो खेळला जात असल्याचं निदर्शनास आलं.

हेही वाचाः दहशत कोरोनाची : ‘इथं’ महिन्यात विकल्या तब्बल 5 कोटी पॅरासिटामॉल !

11 जणांना अटक

यानंतर मडगाव पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्यासह इतर पोलिसांनी अवैधरीत्या सुरू असलेल्या या कॅसिनो चालवणाऱ्या व्यक्तीसह खेळण्यासाठी आलेल्या 11 जणांना ताब्यात घेतलं. घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील राजेश बाबल नाईक (29) हा कॅसिनो चालवत होते, तर अंबाजी फातोर्डा येथील राजेश नाईक हे विन लकी हा गेम चालवत होते. तर प्रमोद राभा (30, मूळ आसाम), राहुल गौड (25, मूळ उत्तरप्रदेश), संतोष जोशी (36, रा. मडगाव), संतोष नायर (39, मडगाव, मूळ केरळ), प्रकाश सिंग (33, रा. विश्रांती लॉज मडगाव, मूळ मध्यप्रदेश), यल्लाप्पा शेलूडी (43, रा . रेल्वेस्थानकानजीक, मूळ बेळगाव), लक्ष्मण सिंग (35, रा. विश्रांती लॉज मडगाव), गोबी सी. (50, जुंता हॉटेल स्टेशन रोड मडगाव, मूळ तामिळनाडू) सादिक विलामुली (41, रा. सिने लतानजीक, मूळ केरळ) या अकरा जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर हे करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!