गोवा सरकारने म्हादई विकली!

'आप'चे राहुल म्हांबरे यांची जोरदार टीका. कर्नाटकातील राजकीय हितसंबंध जपण्यासाठी भाजपाने गोव्याचा केला विश्वासघात.

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर ‘आप’चे नेते राहुल म्हांबरे (Rahul Mhambre) यांनी जोरदार टीका केली आहे. सावंत यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेसच्या अपयशावर चर्चा केली. मात्र म्हादईला वाचविण्याच्या योजनेविषयी काहीच सांगितलं नाही. म्हादई नदी ही गोमंतकीयांची आई आहे. आपल्या मुलांचे भविष्य पणाला लावायचे नसेल, तर सर्व गोमंतकीयांनी एकत्र यावं, असं आवाहन म्हांबरे यांनी केलं.

गोव्याने कर्नाटक सरकारच्या कारवायांविरुध्द औपचारिक तक्रार केल्यास 18 वर्षे झाली. तरीही कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. दिवसेंदिवस आम्ही म्हादईपासुन दुरावत चाललो आहोत. कॉंग्रेसने 10 वर्षे राज्य केले, भाजपाने 8 वर्षे राज्य केले. तरीही हे दोन्ही पक्ष एकमेकांवर दोषारोप करत आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे, तुम्ही तुमचे सरकार स्थापन करण्यासाठी १२ आमदारांना कॉंग्रेसमध्ये घेतले. त्यावेळी त्यांनी आमच्या म्हादईसाठी काय केले, याचा जरा तरी विचार केला का? कॉंग्रेसने काय केले हे सांगण्यासाठी आपण थेट पत्रकार परिषद घेता. तुम्हाला गोमंतकीय मूर्ख आहेत, असे वाटते का? म्हादेईच्या रक्षणासाठी तुम्ही आतापर्यंत काय केले?

म्हादई गोमंतकीयांची आई!
म्हादई नदीचे महत्त्व सांगताना राहुल म्हांबरे म्हणाले की, महदईचे पाणी गोव्यासाठी जीवनवाहिनीचा सर्वात मोठा आणि सिंचनाचा सर्वात मुख्य स्रोत आणि मोठा स्रोत आहे. प्रमोदबाब, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये देखील फिलिप नेरी हेच जलसंपदा विभागाचे मंत्री आहेत, जे त्यावेळी देखील कॉंग्रेस सरकारमध्ये होते. जर तुम्ही म्हादईबद्दल खरंच प्रामाणिक असाल, तर तुम्ही नेरी यांना त्याच विभागाचा ताबा का दिला? गोमंतकियांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? तुम्ही म्हटलं होतं की, मी म्हादईसाठी शक्य तितके प्रयत्न करतोय, मग तुम्ही तुमच्या दिल्ली भेटीत या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा का केली नाही?

कर्नाटकच्या राजकीय हिताचे संरक्षण!
भाजपने केंद्राकडे तडजोड केली आहे. कर्नाटक सरकारमध्ये जास्त खासदार आहेत. म्हणुनच कर्नाटकच्या राजकीय हिताचे संरक्षण करण्यासाठी या निर्णयाचे केंद्र समर्थन करत आहे. गोव्यात केवळ दोनच खासदार आहेत. म्हणून केंद्राला गोमंतकियांचे ऐकण्यात काहीच रस नाही, असं राहुल म्हांबरे म्हणाले.

उन्हाळ्यात काय होईल, याची कल्पना करा!
कोर्टाच्या आदेशाचा कर्नाटक सरकारने अवमान केला आहे आणि तरीसुद्धा मुख्यमंत्री सावंत गप्प आहेत. कर्नाटक सरकारने बांधकाम करून म्हादईचे पाणी वळविले आहे. गोव्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला असला, तरी पाण्याच्या प्रवाहाची पातळी कमी झाल्याचे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. जरा कल्पना करा की उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल?

स्वतःच्या हितापेक्षा गोव्याच्या हिताचा विचार करा!
मुखमंत्र्यांनी स्वतःच्या हितापेक्षा गोव्याच्या हिताचा विचार करावा. गोव्यात फक्त दोन खासदार आहेत. पण म्हादईवर 16 लाख गोमंतकिय अवलंबून आहेत. त्यामुळे सर्व गोमंतकियांनी एकत्र यावे आणि म्हादईचे रक्षण करण्याचा संकल्प करावा. भविष्यात आम्हाला कुणालाही आमची मुले तहानलेली पहायची नाहीत. सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद मागे ठेवून गोमंतकियांच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. चला सर्वांनी एकत्र येऊन आई म्हादईला वाचवूया, सर्वांना आपल्या मुलांचे भविष्य वाचवूया, असं आवाहन राहुल म्हांबरे यांनी केले.

हेही वाचा…
म्हादईप्रश्नी कर्नाटकविरुद्ध सुप्रीम कोर्टात अवमान याचिका
काँग्रेसचाच ‘हात’ ठरला म्हादईचा ‘घात’, गोव्याची दोन दिवसांत अवमान याचिका
जावडेकरांनी हात झटकले; म्हादईप्रश्नी बोलण्यास नकार
म्हादईप्रश्नी या नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा, 2 दिवसांची मुदत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!