दुसऱ्यांना दोष देणं ही सावंत सरकारची कार्यपद्धती!

आम आदमी पक्षाचा हल्लाबोल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे (Rahul Mhambare) यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यावर निशाणा साधताना रोखठोक टीका केलीय. इतरांना दोष देत बसण्याचा खेळ आता बंद करा आणि आपल्या स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील प्रशासन कोलमडले आहे, हे स्वीकारा, असा टोला म्हांबरे यांनी लगावला आहे.

बाहेरून आलेल्या लोकांची कामे लगेच होत आहेत, तर याच मातीतील भूमिपुत्रांना आपली कामे पूर्ण करून घेताना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अदानीचे काम व्हावे आणि त्याच्या मार्गातील अडसर दूर व्हावा यासाठी लोकांचा विरोध असूनही रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण करण्यासाठी सरकार तातडीने व घाईघाईने काम करते. पण स्थानिक गोवेकरांना मदत करण्यासाठी मात्र काहीही करत नाही.

कोविडच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा काहीही उपयोग झाला नाही. कारण ते चालतच नव्हते. त्याचप्रमाणे ऍम्ब्युलन्स वाहनेही उपलब्ध नव्हती. ज्यामुळे लोकांना बरेच पैसे खर्च करून रुग्णांना टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्यावे लागले.

गोयकरांसाठीच पैसे नाहीत?

अदानींना मदत करण्याच्या दृष्टीने जी कामे सुरू आहेत, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करण्यात सरकारला अजिबात अडचण वा कमतरता भासत नाही. पण गोव्यातील लोकांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. लाडली लक्ष्मी योजना डब्यात गेल्यात जमा आहे आणि वैद्यकीय मदतीसाठी असलेली दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना अडवून ठेवण्यात आली आहे, असे महाम्बरे म्हणाले.

इतरांना दोष का?

आम आदमी पक्ष स्थानिक गोमंतकीय व्यक्तींचे हक्क अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा आणि गोमंतकीय जनतेसाठी काम करायला सुरूवात करावी, असे राहुल म्हांबरे म्हणाले. प्रशासनाला योग्य दिशा द्या आणि एकमेकांवर खापर फोडणे वा इतरांना दोष देणे असे प्रकार बंद करा, असेही ते म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!