#GoaElection2022 | केपे, सांगे | काँग्रेस, भाजपचे दावेदार वाढले

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

केपे, सांगे : वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी वेगानं घडतायत. केपे आणि सांगेतही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सुरुवातीला केपे मतदारसंघाच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा.

बाबू कवळेकरांचा बालेकिल्ला

केपे हा ग्रामीण मतदारसंघ. नगरापालिका क्षेत्रातील काही भाग वगळला, तर ग्रामीण बाज या मतदारसंघानं राखून ठेवलाय. या मतदारसंघात सुरुवातीला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं वर्चस्व राखलं. अन्य बहुतेक मतदारसंघांप्रमाणे पहिल्या तीन निवडणुकांत केपेतून मगोचा उमेदवार विधानसभेत गेला. 1963 साली दत्ताराम देसाई, 1967 साली शाबा कृष्णराव देसाई आणि 1972 साली धुळो चिमलो कुट्टीकर हे मगोचे आमदार झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत केपेत काँग्रेसचा विजय झाला आणि मगोची मक्तेदारी संपुष्टात आली. 1977, 1980 आणि 1984 अशा सलग तीन निवडणुकांत काँग्रेसचे वैकुंठ देसाई आमदार झाले. 1980 सालच्या निवडणुकीत ते अर्स काँग्रेसचे आमदार झाले होते. त्यानंतर मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं केपेत मुसंडी मारताना प्रकाश वेळीप यांच्या रुपानं सक्षम पर्याय समोर आणत सलग तीन निवडणुका जिंकून पुन्हा केपेचा गड काबिज केला. 1989, 1994 आणि 1999 साली प्रकाश वेळीप हे अनुसूचित जमातीचे नेते मगोच्या तिकिटावर आमदार झाले. मात्र 2002च्या निवडणुकीत ते भाजपच्या उमेदवारीवर पराभूत झाले. याच निवडणुकीत केपेत चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर या धनगर समाजातील तरुण तडफदार नेत्याचा गोव्याच्या राजकीय पटलावर उदय झाला. काँग्रेसच्या तिकिटावर कवळेकर यांनी विजय मिळवत पहिल्यांदा विधानसभेत पाऊल टाकलं. सत्तेत असताना आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांनी मतदारसंघावरची आपली पकड सैल होऊ दिली नाही. 2002, 2007, 2012 आणि 2017 अशा सलग चार निवडणुका ते काँग्रेसच्याच तिकिटावर जिंकले. इतकी प्रदीर्घ कारकीर्द एकाच पक्षात घडवूनसुद्धा कवळेकर नेहमीच उपेक्षित राहिले. मंत्रिपदानं त्यांना हुलकावणी दिली. 2017च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा मिळूनही सत्ता न मिळाल्यानं काँग्रेसमधील आमदार नाराज बनले. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठीही कोणी विशेष रस दाखवला नाही. अखेर अनुभवी आणि निष्ठावान नेते म्हणून बाबू कवळेकरांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली. विधानसभेतील अनुभवाच्या जोरावर या पदाला न्याय देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. मात्र भाजपच्या रणनितीमुळे जुलै 2019मध्ये काँग्रेसमध्ये भूकंप झाला आणि दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षांतरात विरोधी पक्षनेते असलेल्या बाबू कवळेकर यांची भूमिका महत्त्वाची होती. याची बक्षिसी म्हणून उपमुख्यमंत्रीपदासह कृषी हे त्यांचं आवडतं खातं त्यांना मिळालं.

कवळेकर नेहमीच उपेक्षित

इतकी प्रदीर्घ कारकीर्द एकाच पक्षात घडवूनसुद्धा कवळेकर नेहमीच उपेक्षित राहिले. मंत्रिपदानं त्यांना हुलकावणी दिली. 2017च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा मिळूनही सत्ता न मिळाल्यानं काँग्रेसमधील आमदार नाराज बनले. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठीही कोणी विशेष रस दाखवला नाही. अखेर अनुभवी आणि निष्ठावान नेते म्हणून बाबू कवळेकरांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली. विधानसभेतील अनुभवाच्या जोरावर या पदाला न्याय देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. मात्र भाजपच्या रणनितीमुळे जुलै 2019मध्ये काँग्रेसमध्ये भूकंप झाला आणि दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षांतरात विरोधी पक्षनेते असलेल्या बाबू कवळेकर यांची भूमिका महत्त्वाची होती. याची बक्षिसी म्हणून उपमुख्यमंत्रीपदासह कृषी हे त्यांचं आवडतं खातं त्यांना मिळालं.

काँग्रेसमध्ये दावेदार वाढले

प्रकाश वेळीप यांच्यानंतर प्रदीर्घकाळ केपेचं प्रतिनिधित्व करणार्‍या कवळेकर यांना अखेर मंत्रिपद मिळालं. झेडपी आणि नगरपालिका निवडणुकीत आपले समर्थक निवडून आणत कवळेकर यांनी केपेवरील आपली पकड घट्ट असल्याचं सिद्ध केलं. इतर आमदारांच्या प्रवेशानंतर त्या त्या मतदारसंघातील निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या, तितक्या तीव्र प्रतिक्रिया केपेत दिसून आल्या नाहीत. तरीही बाबू कवळेकर यांच्या प्रवेशामुळे काही भाजप निष्ठावंत दुखावलेच. दुसरीकडे, केपे म्हणजे बाबू आणि बाबू म्हणजेच केपे काँग्रेस असं समीकरण असल्यानं विधानसभेच्या दृष्टीनं काँग्रेसचं पर्यायी नेतृत्व उभं राहिलंच नाही. पण कवळेकर भाजपवासी झाल्यानंतर मतदारसंघात एका बाजूने काँग्रेस पक्ष संपुष्टात आल्यासारखी स्थिती असताना आजच्या घडीला काँग्रेस पक्षाकडे एक नव्हे, तर तीन उमेदवारांनी तिकिटासाठी दावेदारी केलीय. भाजपमध्ये 2017च्या निवडणुकीतच इच्छुकांची भाऊगर्दी होती. कवळेकर यांच्या विरोधात त्यावेळी माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनाच भाजपनं तिकीट दिलं, मात्र कवळेकर यांचा पराभव करण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. आता कवळकरच भाजपवासी झाल्यामुळे केपे मतदारसंघावरील त्यांचं वर्चस्व पाहता भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी मिळणं जवळपास अशक्य बनलंय. आजच्या घडीला तरी भाजप सोडून दुसर्‍या पक्षाच्या तिकिटावर केपेतून जिंकून येणं सोपं नाही, ही वस्तुस्थिती असल्यामुळे भाजपमधील इच्छुकांच्या हालचाली तूर्त थंडावल्या आहेत. मात्र ज्या काँग्रेसला कवळेकरांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर मरगळ आली होती, ती मरगळ दूर करण्यासाठी समाज कार्यकर्ते एल्टन डिकॉस्ता यांनी दंड थोपटले आहेत. हल्लीच काँग्रेसनं नेमलेल्या मीडिया टीममध्ये ते सक्रिय आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी ते मुख्य दावेदार असल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. मात्र माजी नगराध्यक्ष राऊल परेरा यांच्यासह बाबू कवळेकर यांचे पूर्वीचे खंदे समर्थक अर्जून वेळीप यांनीही काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केल्यानं भाजपपेक्षा काँग्रेसच्या श्रेष्ठींवरच दबाव येणार आहे. राऊल परेरा यांनी 1999मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी मगोचे प्रकाश वेळीप यांनी त्यांचा केवळ 639 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आता काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी ते प्रयत्न करतायत. मात्र आजच्या घडीला राऊल परेरा यांचा फारसा प्रभाव राहिलेला नाही. दुसरीकडे, कवळेकर यांचे माजी स्वीय सचिव अर्जून वेळीप यांनी पंचायत सचिवपदाचा सरकारी नोकरीचा राजीनामा देत कवळेकर यांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्याचं जाहीर करून बिगूल फुंकलंय. त्यामुळे काँग्रेसच्या तिकिटाचे दावेदार असलेले एल्टन डिकॉस्ता यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

एल्टन डिकॉस्ता, वेळीप चर्चेत

अर्जून वेळीप याचे वडील सोनू वेळीप हे कट्टर काँग्रेस समर्थक होते. ते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे जवळेचे कार्यकर्ते होते. केपेत काँग्रेसचं विशेष अस्तित्त्व नव्हतं, तेव्हापासून अर्जून वेळीप यांचे वडील काँग्रेसमध्ये कार्यरत होते. सुरुवातीला अर्जून वेळीप यांनी झेडपी निवडणुकीत आपला अर्ज मागे घेत कवळेकर यांना संधी दिली होती. त्यानंतर कवळेकर यांना केपे मतदारसंघातून चार वेळा निवडून आणण्यात त्यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली. 2002 साली ते कवळेकर यांचे खासगी सचिव होते. त्यानंतर ते सरकारी नोकरीत रुजू झाले. कवळेकर उपमुख्यमंत्री बनल्यानंतर वेळीप हे त्यांचे सरकारी स्वीय सचिव बनले. मात्र कवळेकर यांच्या निर्णयप्रक्रियेवरून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि अर्जुन वेळीप यांनी नोकरीचा राजीनामा देऊन कवळेकरांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला. 1999 सालापासून अर्जुन वेळीप हे काँग्रेसची शाखा असलेल्या सेवादलच्या माध्यामातून काँग्रेसशी एकनिष्ठ होते. 2006 सालापर्यंत त्यांनी गट अध्यक्ष वगैरे पदांवर काँग्रेससाठी काम केलं. त्यांच्या दाव्यानुसार तेच काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही, तर दुसरा पर्याय आपण ठेवला असून निवडणूक लढवण्यच्या निर्धारापासून हटणार नसल्याचं वेळीप यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे काँग्रेसमध्ये तिकिटासाठी एल्टन डिकॉस्ता आणि अर्जुन वेळीप यांच्यात चुरस निर्माण झालीय.

प्रकाश वेळीप पुन्हा रिंगणात

प्रकाश शंकर वेळीप हे भाजपचे बुजुर्ग नेते पुन्हा रिंगणात उतरू शकतात. भाजपच्या तिकिटावर 2017च्या निवडणुकीत 10 हजारहून अधिक मतं मिळवत त्यांनी कवळेकर यांना घाम फोडला होता. मात्र कवळेकरांच्या प्रवेशामुळे वेळीप यांना भाजपची उमेदवारी मिळणं कठीण आहे. त्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरतात का, की एखाद्या पक्षाच्या तिकिटावर ते निवडणूक लढवतात, याबाबत अद्याप तरी साशंकता आहे. आम आदमी पार्टी, गोवा फॉरवर्ड हे पक्ष केपे मतदारसंघात योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. 2011 साली तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे स्वीय सचिव असलेले प्रकाश अर्जुन वेळीप यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देत केपेत निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता अर्जुन वेळीप यांनी प्रकाश वेळीप यांच्या पावलावर पाऊल टाकून निवडणूक लढवण्यासाठी सरकारी नोकरीला रामराम ठोकलाय.

केपे मतदारसंघात खोल, बार्से, फातर्पा, बाळ्ळी, आंबावली, बेतुल, कोठंबी, अवेडे, मोरपिर्ला या पंचायतींचा समावेश होतो. शिवाय केपे ही नगरपालिकाही याच मतदारसंघात येते. सध्या 32 हजार 571 इतके मतदार या मतदारसंघात आहेत. सध्या तरी बाबू कवळेकर यांना भाजपचं पाठबळ असल्यामुळे त्यांचंच पारडं जड असल्याचं दिसतंय. पण भाजपमधील कुरबुरींची टांगती तलवारही त्यांच्या डोक्यावर कायम आहे. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड, मगो आणि आरजीच्या सावध हालचाली सुरू आहेत, तर आम आदमी पार्टीतर्फे पेट्रेसिया फर्नांडिस निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत.

सांगे मतदारसंघाकडे लक्ष

ग्रामीण तालुका अशी ओळख असलेल्या निसर्गरम्य सांगे मतदारसंघात सुरुवातीच्या चार निवडणुकांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार जिंकून आले. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिलं. 1963 साली टोनी फर्नांडिस, 1967 आणि 1972 साली वासुदेव मोरजकर, 1977 साली सदाशिव मराठे हे मगोचे आमदार झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत सांगेत काँग्रेसचा विजय झाला. 1980 साली अर्स काँग्रेसचे गुरुदास नाईक तारी आणि 1984 साली काँग्रेसचे पांडू वासू नाईक आमदार बनले. 1989 सालच्या निवडणुकीत राणू अनंत प्रभू देसाई यांनी मगोचा गड पुन्हा मिळवला. मात्र 1994च्या निवडणुकीत पांडू वासू नाईक पुन्हा काँग्रेसचे आमदार झाले. 1999 सालच्या निवडणुकीपासून भाजपनं सांगेत प्रवेश केला. 1999 साली प्रभाकर गावकर हे भाजपचे सांगेतील पहिले आमदार बनले. त्यानंतर 2002 आणि 2007च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर वासुदेव मेंग गावकर हे आमदार बनले. 2012 साली सुभाष फळदेसाई यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवून विजय मिळविला. मात्र 2017च्या निवडणुकीत प्रसाद गावकर या एसटी समाजातील तरुणाने भाजपच्या फळदेसाईंना पराभूत करून अपक्ष म्हणून विधानसभेत पाऊल टाकलं.

प्रसाद गावकर काँग्रेसच्या दिशेने?

2019 साली पक्षांतराची मोठी लाट आली. त्यात काँग्रेसचे दहा आणि मगोचे दोन अशा बारा आमदारांनी भाजपात प्रवेश केला. मात्र सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. सुरुवातीचा काही काळ त्यांनी भाजप सरकारला सहकार्य केलं. पण नंतर त्यांनी पाठिंबा मागे घेत असल्याचं जाहीर केलं. ते विरोधी आमदार बनले. सध्याच्या स्थितीत प्रसाद गावकर यांचं एक पाऊल काँग्रेसमध्ये असल्यासारखी स्थिती आहे. आपण काँग्रेसच्या नेत्यांशी बोललो असून योग्य वेळी सर्व गोष्टी घडतील, असं ते सांगतात. मात्र गावकर यांच्या भावानं आणि जवळच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे प्रसाद गावकर यांनी सध्या संदिग्ध उत्तर दिलं असलं, तरी ते काँग्रेसच्या तिकिटावरच सांगेतून निवडणूक लढवतील, हे जवळपास निश्चित आहे.

सुभाष फळदेसाई, सावित्री कवळेकरांत चुरस

प्रसाद गावकर यांच्यासह सध्या दुसरं चर्चेतील नाव आहे ते भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांचं. गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही फळदेसाई यांनी सांगेतील मतदारांच्या गाठीभेठी सुरूच ठेवल्या. अनेक विकासकामांत स्वत: लक्ष घातलं. अलीकडेच आलेलं तौक्ते चक्रिवादळात त्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून काम केलं. साळजिणी इथल्या ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन वन खात्याच्या अखत्यारीतील जंगलातून रस्ता करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. भाजप नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असल्यामुळे सांगेतून भाजपच्या तिकिटाचे प्रबळ दावेदार म्हणून फळदेसाई यांच्याकडे बघितलं जातं. झेडपी आणि नगरपालिका निवडणुकीत त्यांनी निर्भेळ यश मिळवत आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली. सांगे हा अनुसूचित जमातींच्या मतदारांची मोठी संख्या असणारा मतदारसंघ. त्यामुळे या मतदारसंघात अन्य वर्गाच्या मतदारांसह एसटींची मतं खेचणारा उमेदवारच सांगेचा आमदार बनू शकतो. केप्याचे विद्यमान आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे केवळ केपेपुरते मर्यादित नाहीत. सांगेतही त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी सावित्री कवळेकर या मतदारसंघात फार पूर्वीपासून सक्रिय आहेत. अद्याप त्यांनी भाजपच्या तिकिटावर जाहीरपणे दावा केला नसला, तरी नगरपालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनल असतानाही त्यांनी आपले उमेदवार उभे करून ताकद अजमावून पाहिली. मात्र नगरपालिका क्षेत्रातही फळदेसाई यांनीच बाजी मारल्यामुळे सावित्री कवळेकरांचा हिरमोड झाला.

सांगे मतदारसंघात वाडे कुर्डी, उगे, नेत्रावळी, कावरे पिर्ला, मळकर्णे, भाटी, रिवण या पंचायती आणि सांगे नगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे, तर 26 हजार 567 इतके मतदार आहेत. सांगेच्या राजकीय आखाड्यात सध्या तरी विद्यमान आमदार प्रसाद गावकर, भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई आणि बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर सक्रिय आहेत. सावित्री यांच्या नावांची जोरदार चर्चाही आहे. 2017च्या निवडणुकीत त्यांनी 5 हजार 736 मतं मिळवली होती, तर दुसर्‍या क्रमांकावर असलेले सुभाष फळदेसाई यांना 6 हजार 699 मतं मिळाली होती. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळते यावर सगळी गणितं अवलंबून आहेत. कारण बंडखोरी झाली, तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो आणि काँग्रेसच्या वाटेवर असणारे प्रसाद गावकर पुन्हा विजयी ठरू शकतात. केपे मतदारसंघात ज्याप्रमाणे काँग्रेसला बंडखोरीचा धोका आहे, तसाच धोका सांगे मतदारसंघात भाजपलाही आहे. यातून कोणाला विधासभेत पाठवायचं याचा निर्णय केपे आणि सांगेतील मतदारांच्याच हातात आहे.

व्हिडिओ पाहा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!