पेडणे महामार्गावर काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावा

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी कंत्राटदार-अभियंत्यांना सूचना दिल्या

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचं काम पावसातही चालू आहे. त्यामुळे पत्रादेवी, पोरस्कडे, मालपे, धारगळ येथील सर्व्हिस रस्त्ये अत्यंत धोकादायक स्थितीत आलेत. अनेक ठिकाणी खड्डे पडून डबकी तयार झालीत. या रस्त्यांविषयी नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला. मात्र सरकारला आणि कंत्राटदारांना जाग आली नाही. याविषयी लेखी निवेदने दिली, वर्तमानपत्रात वारंवार वृत्त प्रसिद्ध केलं, तरीही सरकारचं धोरण गोगल गाय नि पोटात पाय असं आहे.

हेही वाचाः गोव्यात शिवसेना करणार क्रांती

उपमुख्यमंत्री आजगावकरांनी घेतली बैठक

या भागाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. पेडणे शासकीय विश्राम धाम येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना सुचना केल्यात. जिथे धोका निर्माण झालाय, पाणी साचलंय, तिथे सूचना फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्यात. यावेळी बैठकीला राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता गुप्ता, कंत्राटदार श्रीनिवास वेणू, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, चांदेल सरपंच संतोष मळीक, पंच समील भाटलेकर, प्रदीप कांबळी, प्रदीप पटेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचाः दक्षिण गोव्यात एनएसए लागू; सरकार म्हणते नियमीत प्रक्रिया

पुढच्या आठवड्यात मंत्र्यांसोबत पाहणी

या रस्त्याच्या धोकादायक स्थितीचा आढावा यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी सरपंच, नागरिक, कंत्राटदार तसंच अभियत्यांसमोर वाचला. वारंवार सांगूनही जर कंत्राटदार ऐकत नसेल, तर त्यांना ताकीद द्यावी लागणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर याविषयी चर्चा करणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले. पुढच्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर यांच्यासहित या महामार्गाची परत एकदा पाहणी करणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

हेही वाचाः CRIME | आरोपी विश्रांती गावसला सशर्त जामीन मंजूर

पूर्वीही केली होती तक्रार

पत्रादेवी ते धारगळ, महाखाजन, कोलवाळ पूलपर्यंतचा राष्ट्रीय  महामार्ग अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. ज्या ठिकाणी काम चालू आहे, तिथे कोणत्याच प्रकारचे फलक नाहीत. रात्रीच्या वेळी रेडीयम असलेले दिशाफलक स्पष्ट दिसत नसल्याने अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्याचा एक भाग म्हणून १३ रोजी मालपे रस्त्याचं काम सुरू आहे. त्याठिकाणी एका ट्रकला अपघात झाला होता.  या रस्त्याचं काम जीएमआर कंपनीला मिळालंय. स्वाभिमानी पेडणेकरांनी या ठेकेदाराच्या विरोधात आवाज उठवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र  झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. म्हणून स्वाभिमानी पेडणेकरांनी थेट न्यायालयात धाव घेऊन या ठेकेदाराविरोधात तक्रार नोंदवावी म्हणून याचिका दाखल केली आणि न्यायालयाने दाखल घेऊन पेडणे पोलिसांना या ठेकेदाराविरोधात पहिला गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!