डाळी कडाडल्या, खाद्यतेलासह मासेही महागले

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: राज्यात सध्या महागाईचा भडका उडाला असून सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. वाढती महागाई सर्वसामान्य लोकांना खूप त्रासदायक ठरत आहेत. करोना काळात आता लोकांना महागाईचेही चटके बसत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय तसंच सर्वसामान्य गरीब जनतेची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. या महागाईच्या आगडोंबामध्ये गरीब जनता मात्र होरपळून गेली आहे. भाजप सरकारने अनेकदा महागाई कमी करण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं. पण, महागाई अद्याप आटोक्यात आली नाही.
हेही वाचाः हणजूण येथे फिल्म शुटिंगची अफवा; ग्रामस्थांत गोंधळ
डाळ, खाद्यतेल, मासे, नारळ यांचे दर गगनाला भिडले
दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या किमती खूप महाग झाल्या आहेत. गोमंतकीयांना दररोज लागणारे मासे, खाद्यतेल 140 ते 180 रुपये प्रती लिटरवर गेले आहे. नारळ 20 ते 53 रुपयांनी एक विकला जात आहे. तुरडाळ 100 रुपये किलाेच्या घरात गेली आहे. वाटाणे 90 रुपये किलाे, तर अंडी 80 रुपये डझनने विकली जात असून जीवनावश्यक वस्तूच्या किंमती भडकल्या आहेत. लोकांना या वस्तू खरेदी करताना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. सरकारने या जीवनावश्यक वस्तूंवर सूट देणं गरजेचं होतं. गोमंतकीयांना स्वयंपाकासाठी नारळ रोज लागतो. त्याशिवाय स्वयंपाक करणं कठीण जातं. तसंच जेवणात तेलही दैनंदिन लागणारं साहित्य आहे. देवघरात दिवा लावण्यासाठी तेलाचा सकाळ-संध्याकाळ तेलाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे शाकाहारी जेवणात लागणारी तुरडाळही महागली आहे. या सर्वांचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. आता मासेमारी बंद असल्याने माशांच्या किमतीही महाग झाल्या आहेत.
हेही वाचाः दिलासादायक! मागच्या ५४ दिवसातली सर्वात कमी रुग्णवाढ! देशातील मृत्यूही घटले
करोनामुळे मोठा आर्थिक फटका
अगोदरच करोनामुळे काम धंदा गमावून बसलेल्या हजारो लोकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लोकांना या महागाईचा भडका सहन करावा लागत आहे. कारोनामुळे राज्यातील अनेक युवकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. काही जणांना आपले धंदे, व्यवसाय बंद करावे लागले आहेत. तर आता लोक महागाईच्या खाईत अडकले आहेत. सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती काही प्रमाणात तरी कमी करणं गरजेचं आहे. अन्यथा गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.